Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांवरून राजकारण चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलं विधान, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंबाबत केलेलं विधान, अजित पवारांनी संभाजी महाराजांबाबत केलेलं विधान, जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेब क्रूर नसल्याचं केलेलं विधान तर चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबाचा ‘औरंगजेबजी’ असा केलेला उल्लेख चर्चेत आला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. यासंदर्भात आक्रमक भूमिका मांडणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता भाजपाला यावरून खोचक शब्दांत सुनावले आहे.
संजय राऊतांनी ‘सामना’तील त्यांच्या रोखठोक या सदरामध्ये यासंदर्भात भूमिका मांडताना भाजपातील नेतेमंडळींना टोले लगावले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊतांनी तोंडसुख घेतलं आहे.
“वडिलांच्या अपमानावर मुलाच्या अपमानाचा उतारा”
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयीच्या विधानांचा राऊतांनी उल्लेख केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचे प्रकरण आता मागे पडले असून भारतीय जनता पक्षाने वडिलांच्या अपमानावर उतारा म्हणून पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमानाचे प्रकरण समोर आणले. शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजभवनात बसून आहेत व संभाजीराजांच्या अपमानाबद्दल अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने सुरू केली. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाची ही दशा आहे! शिवाजी महाराजांच्या अपमानाचे प्रकरण सगळय़ात जास्त गंभीर असतानाही भाजपने त्यावर आवाज उठवला नाही याची इतिहासात नोंद राहील”, असं संजय राऊतांनी यात म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे ‘पोलिटिकल कपल’!
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख राउतांनी महाराष्ट्राचे पोलिटिकल कपल असा केला आहे. “राजभवनावर योगी आदित्यनाथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस गेले. त्या भेटीदरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सुहास्यवदनाने उभे असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांशी महाराष्ट्रातील ‘पोलिटिकल कपल’ अत्यंत सलगीने वागताना टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांवर जनतेने पाहिले. प्रेम आंधळे असते, पण यांना सत्तेने आंधळे केले व त्या अंधारात शिवरायांचा मान-सन्मान हरवला!” अशा शब्दांत राऊतांनी आगपाखड केली आहे.
धार्मिक गोंधळाचा नवा इतिहास!
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर गप्प बसणारे छत्रपती संभाजीराजांच्या कथित अपमानावर अजित पवारांच्या विरोधात रान उठवत आहेत. औरंगजेब क्रूर नव्हता, असा साक्षात्कार राष्ट्रवादीच्या एका आमदारास याच वेळी झाला व औरंगजेबजी हे सन्माननीय आहेत, असे भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पटले. महाराष्ट्रातील धार्मिक गोंधळाचा हा नवा इतिहास”, असंही या सदरात राऊतांनी नमूद केलं आहे.