जालन्यात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. राजकीय वर्तुळातून या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. विरोधकांनी हे सर्व सरकारच्याच आदेशांनी घडवून आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दोन दिवसांत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात घटनादुरुस्ती विधेयक आणावं, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. “तुमच्या अधिकारांसाठी किंवा लोकनियुक्त सरकारचा आवाज दाबण्यासाठी संसदेत विशेष विधेयक आणता आणि जबरदस्तीने मंजूर करून घेता. मग संसदेच्या या विशेष अधिवेशन मराठा आरक्षणासंदर्भात घटनादुरुस्ती करून तुम्ही त्यांना न्याय का देत नाही?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांना आलेला अदृश्य फोन कुणाचा होता – संजय राऊत
मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचे आदेश देणारा फोन कुणी केला होता? असा प्रश्नही संजय राऊतांनी केला आहे. “मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना तिथे जाण्याचं तोंड नाहीये. कारण त्यांनीच आंदोलन चिरडून टाकण्याचे आदेश दिलेत. अदृश्य फोन कुणाचा होता? मुख्यमंत्री की गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून होता? लाठीहल्ल्यात पोलिसांचा दोष नाही. तिथल्या पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. तुम्ही यात पोलिसांचा बळी देताय. पण वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय पोलीस प्रमुख हा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना वरून आदेश आले. आता हे वरून म्हणजे कुठून आले ही गोपनीयता पोलीस अधिकारी पाळतायत”, असं राऊत म्हणाले.
“जालन्यात उपोषण चिरडणारा जनरल डायर…”, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल!…
“सरकारमध्ये तीन जनरल डायर”
यावेळी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जनरल डायरची उपमा दिली आहे. “जनरल डायर कोण हे सगळ्यांना कळलंय. महाराष्ट्रात तीन तीन जनरल डायर आहेत. एक मुख्य व दोन उप जनरल डायर. जनरल डायरच्या मानसिकतेतून राज्य चालू आहे”, असं त्यांनी नमूद केलं.
“हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, किरीट सोमय्या, भावना गवळी यांना या २६ जानेवारीला बहुतेक पद्मश्री, पद्मभूषण कुणाला भारतरत्न अशा पदव्या द्यायची शिफारस चालली आहे. ब्रिटिश काळात सरकारच्या चमच्यांना रावसाहेब, रावबहादूर अशा पदव्या द्यायचे. मग त्यांनी कितीही गुन्हे केलेले असू द्या. आता भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलेल्या सगळ्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, १०-२० हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना कदाचित भारतरत्नही देतील”, असा टोलाही राऊतांनी लगावला.