कोल्हापुरात आज सकाळपासूनच काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केल्यामुळे वातावरण तापल्याचं पाहायला मिळत होतं. काही व्यक्तींनी डीपी-स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवल्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, यावेळी परवानगी नसतानाही आंदोलकांनी मोर्चा काढला. त्यामुळे पोलिसांकडून त्यावर कारवाई करण्यात आली. सौम्य लाठीचार्जही झाला. कोल्हापुरातील या सगळ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलं असताना दुसरीकडे विरोधकांनी यासंदर्भात वेगळीच शक्यता बोलून दाखवली आहे.
नेमकं काय झालं?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी काही व्यक्तींनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवल्यामुळे त्यावरून हा वाद निर्माण झाला. यासंदर्भात काही हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापुरात निषेध आंदोलन केलं. त्याचवेळी मोर्चाही काढला. यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. अशा प्रकारे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत असताना ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी टीव्ही ९ शी बोलताना या प्रकारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
“निवडणुकांसाठी हे चाललंय का?”
“हा औरंग्याला गाडणारा महाराष्ट्र आहे. कोण डीपी ठेवतंय, पोस्ट टाकतंय. पण ही कुणाची हिंमतच नाहीये. सरकार तुमचं आहे ना? मग असं करण्याची कुणाची हिंमत होते कशी? हे उपद्व्याप करणारे तुम्हीच पेरलेले लोक नाहीत ना? वातावरण खराब करावं, औरंगजेबाच्या नावाने पुढचे ५-६ महिने तणाव निर्माण करावा आणि मग निवडणुकांना सामोरं जावं असं तुमचं नियोजन आहे का?” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
“हे काहीही करू शकतात. हे चित्र आपण देशभरात पाहिलंय. उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरातमध्ये हे झालं. आता महाराष्ट्रातही करतील. औरंगजेबाच्या नावानं आरोळ्या ठोकण्याची यांची हिंमतच नाहीये. हे कोण करतंय, यामागे कोणतं षडयंत्र आहे हे पाहावं लागेल. करा ना कारवाई. तुमचं पोलीस खातं आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, फासावर लटकवा. लोक संतप्त आहेत. आम्ही संतप्त आहोत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावं”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली.
“हे कसलं राज्य करताय तुम्ही?”
“कोल्हापूरसारख्या ठिकाणी हे वारंवार घडवलं जातंय. देशात असा तणाव कोण निर्माण करतंय हे सगळ्यांना माहिती आहे. ज्या औरंग्याला आम्ही गाडलंय, जो पुन्हा उठणार नाही, तरीही जर काही लोक हे धाडस करत असतील तर ते सरकारचं अपयश आहे. मुंबईच्या मरीन लाईन्सला एका हॉस्टेलमध्ये तरुण मुलीची आत्यमहत्या झाली की हत्या झाली माहिती नाही. हे रोज महाराष्ट्रात होतंय. कसंल राज्य करताय तुम्ही?” असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.