गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वेगवेगळ्या व्यक्तींसोबत फोटो पोस्ट करत आहेत. या व्यक्ती गुंड, अपहरणकर्ते, खूनी किंवा अट्टल गुन्हेगार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, या अनुषंगाने शिंदे सरकारवर विरोधकांकडून परखड शब्दांत टीका केली जात आहे. यासंदर्भात आजही संजय राऊतांनी एक्सवर (ट्विटर) एक फोटो शेअर केला असून त्यासंदर्भात पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे सोशल पोस्टमध्ये?

संजय राऊतांनी आज लाल सिंग नामक व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो शेअर केला आहे. “पैचान कौन? गृहमंत्री महोदय.. हे लालसिंग महोदय आहेत. खंडणी, अपहरण अशा किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुन्ह्यातील आरोपी. टीम मिंधेचे खास सदस्य. काय करणार तुम्ही? गुंडांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य!” अशी पोस्ट राऊतांनी केली आहे.

“महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यात तुम्ही लक्ष घाला. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालंय. गुंडांनी राज्याचा ताबा घेतलाय. त्यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी आमची मागणी आहे. ताबडतोब निवडणुका घ्याव्यात. नाहीतर गुंड इथे हैदोस घालतील. हा हैदोस चालूच आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

“हा फक्त गुंड नव्हे, महागुंड”

“मी आज पोस्ट केलेल्या फोटोतला फक्त गुंड नाही, महागुंड आहे. त्यांच्या पक्षात छोटेमोठे गुंड असेही बसले आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यातून त्यांच्या पक्षात येणाऱ्या गुंडांना मी रोज अशा प्रकारे समोर आणत आहे. पण हे सरकार काय करतंय? मुख्यमंत्री काय करत आहेत?”, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

“पुण्यात निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला झाला. तिथल्या पोलीस आयुक्तांनी चार्ज घेतला तेव्हा काही गुंडांची ओळख परेड केली होती. काल ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला, त्यांची परेड का नाही केली? पोलीस आयुक्त घाबरले का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्या गुंडांचं समर्थन करतायत. पोलीस आयुक्तांनी ही नौटंकी बंद करावी. हे हल्ले करणाऱ्या राजकीय गुंडांचीही परेड करा. त्यांच्या हातात बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही पोलीस आयुक्त, नाहीतर तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते”, असं थेट आव्हान संजय राऊतांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना केलं आहे.

“मोदींनी केदारनाथ गुहेत जाऊन तपश्चर्या करण्याची वेळ आली आहे”, सजय राऊतांचा टोला; म्हणाले, “ते खोटं बोलतात आणि…!”

“त्या फेकूचंदवर कोण विश्वास ठेवणार?”

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणात उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘करमचंद जासूस’ असा केल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता संजय राऊतांनी त्यावरून टीका केली. “आता त्या फेकूचंदवर कोण विश्वास ठेवणार? हे फेकूचंद आहेत. गुंडांचे सरदार आहेत. हे त्यांचं चोरमंडळ आहे. या चोरमंडळाचे सरदार फेकूचंद आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत खंडणीखोर, बलात्कारी, अपहरणकर्ते, खूनी आहेत. त्यामुळे आपल्या फेकूचंद मुख्यमंत्र्यांना आसपास सगळे करमचंद दिसत आहेत. जे तुरुंगात असायला पाहिजेत, ते मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams cm eknath shinde devendra fadnavis on pune attacke case pmw
Show comments