भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असल्याची अनेक वर्षांची धारणा आहे. मात्र आसाम राज्याने केलेल्या एका दाव्यामुळे आता जोरदार वाद उफाळला आहे. सहावं ज्योजिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. तशी जाहीरात आसामच्या पर्यटन विभागाने काढली आहे. या जाहीरातीवर आता राज्यातून जोरदार टीका होत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी या जाहीरातीवरुन शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा पोरकटपणा..

“आसाम राज्यावर आपल्या मुख्यंमत्र्यांचे फार प्रेम आहे. कामाख्या देवी आणि इतर काही प्रकरणे मध्यंतरी झाली. त्यामुळे आसामच्या कृतीवर आमचे मुख्यमंत्री आता काय बोलतात, हे पाहावे लागेल. हा पोरकटपणा चालला आहे. गुजरात आमच्या उद्योगांवर आक्रमण करत आहेच. आता आसामचे मुख्यमंत्री आमच्या देवधर्मावर आक्रमण करु लागले आहेत”, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

हे वाचा >> “तिथं तुमची सर्व सोय.. बदल्यात ज्योतिर्लिंग देऊन आला नाहीत ना?”, सुप्रिया सुळेंनी ‘ED सरकार’ म्हणत केली टीका

मंदिरावरुन चाललेलं राजकारण गलिच्छ

“राज्यातून उद्योग गेले, आता मंदिरे देखील नेणार का? प्रत्येक राज्यातल्या मंदिराचा आम्ही आदर करतो. पण भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातच आहे. आसाममध्ये ज्योतिर्लिंगाचाही आम्ही आदर करतो, पण मंदिरांवरुन राज्या राज्यांमध्ये वाद निर्माण करणं, हे गलिच्छ राजकारण आहे. प्रत्येक राज्यातल्या मंदिराबाबत आम्हाला आदर आहे. पण सहावं ज्योतिर्लिंग हे भीमाशंकर येथे आहे. फक्त महाराष्ट्राला डिवचायचे, महाराष्ट्राला मागे ढकलायचे म्हणून वाद निर्माण करु नका. या देशात आताच्या काळात अनेक वाद निर्माण झाले आहेत, पण एकाच धर्मात आणि राज्या राज्यात वाद निर्माण करणे किती योग्य आहे?”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग देले का? सुप्रिया सुळे

“घटनाबाह्य ED सरकार – आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना? अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही.” अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टिकस्र सोडले.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!”

कामख्या देवी महाराष्ट्रात आहे का सांगू नये?

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा ह्यांनी भीमाशंकर येथिल ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा करून महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या श्रद्धेवर घाव घातला आहे. महाराष्ट्रातील उद्योगांवर अधिकार सांगणे पाहिलं होतं. पण महाराष्ट्रातील श्रद्धास्थानावरही दावा इतर राज्ये करू लागली आहेत. हे महाराष्ट्राच्या कमकुवत पणाचे लक्षण तर नाही ना. हे आमचे श्रद्धेचे स्थान आहे. हे सरकारने 12 कोटी जनतेच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितले पाहिजे.आता पौराणिक कथा देखिल राजकारणाचा भाग होऊ लागल्या आहेत. कामख्या देवी महाराष्ट्रात आहे का सांगू नये?”

महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे भीमाशंकर

महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत भीमाशंकर मंदिर वसलेले आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर सहाव्या क्रमांकावर आहे. या मंदिरातील स्थापित शिवलिंगाचा आकार खूप मोठा आणि जाड आहे म्हणून त्याला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams cm eknath shinde on aasam government claims that bhimashankar sixth jyotirlinga is in aasam kvg
Show comments