शुक्रवारी झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेतील ११ जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजेच ९ उमेदवार जिंकून आले. विरोधी पक्षाकडून देण्यात आलेल्या ३ उमेदवारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. या पराभवाची कारणमीमांसा सध्या महाविकास आघाडीमध्ये चालू आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या कोट्यातली नेमकी कुणाचं मतं कुणाकडे गेली? यावर चर्चा चालू असतानाच ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केला आहे.
काय लागला विधानपरिषद निवडणूक निकाल?
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान झालं. भाजपाकडून देण्यात आलेले पाचही उमेदवार जिंकून आले. त्यातील सदाभाऊ खोत यांना पहिल्या पसंतीची मतं कमी मिळाली. पण दुसऱ्या पसंतीच्या मतांवर ते निवडून आले. त्यापाठोपाठ सत्तेतील शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचेही प्रत्येकी दोन उमेदवार जिंकून आले. दुसरीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या जिंकून आल्या. पण जयंत पाटील यांना अवघी १२ मतं मिळाली. शरद पवार गटाची सगळी मतं जयंत पाटील यांना मिळाली असताना दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीची मतं त्यांना मिळू शकली नाहीत.
या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेसकडे ३७ मतं असताना प्रज्ञा सातव यांना २५ मतं मिळाली. उरलेल्या १२ मतांपैकी ५ मतं मिलिंद नार्वेकरांना पडली. पण ७ मतं फुटली आणि त्यामुळे जयंत पाटील यांचं विजयाचं गणित बिघडलं. याचसंदर्भात संजय राऊतांनी आता मोठा दावा केला आहे.
“ही ‘ती’च सात मतं आहेत”
“काँग्रेसची ७ मतं फुटली हे स्वत: नाना पटोलेंनी मान्य केलं आहे. पण ७ मतं फुटली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. मागच्या विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरेंचा पराभव करणारे हेच ७ लोक होते. दोन वर्षांपूर्वी चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते. तेव्हाही या ७ लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं होतं. काँग्रेसची ही ७ मतं गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेसबरोबर नाहीत. ती फक्त कागदावर सोबत आहेत. ते नावानिशी समोर आले आहेत. तेच हे ७ लोक आहेत”, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.
“काँग्रेसच्या या सात जणांना सोबत घेऊन कालचा जो खेळ केला, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र जिंकला असं काही होत नाही. लहान पक्ष, अपक्ष सरकारबरोबर राहात असतात. काल तर आमदारांचा भाव तुम्ही पाहायला हवा होता. शेअर बाजाराप्रमाणे आमदारांचा भाव चढत होता. तो भाव २० ते २५ कोटींच्या घरात होता. शिवाय नुसता भाव नाही, काही आमदारांना दोन एकर जमीनही दिली”, असा दावाही संजय राऊत यांनी केला.