सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील नाराजीनाट्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या प्रकरणावर पालघरमध्ये बोलताना शिंदे आणि फडणवीस या दोघांनी कोणताही बेबनाव नसल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. मात्र, तरीही पडद्यामागच्या घडामोडींवर तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यातच आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. आधी या नाराजीनाट्यावरून आणि आता वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून विरोधी पक्षांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
मुंबईतील ‘त्या’ घटनेचा राऊतांनी केला उल्लेख
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला. मुंबईत दोन दिवसांपूर्वी धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका २० वर्षांच्या युवतीशी ४० वर्षांच्या करीम शेखनामक विकृतानं गैरवर्तन केल्यामुळे मुंबईत खळबळ उडाली. पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणावर बोलताना अजित पवारांनी सरकारवर परखड टीका केल्यानंतर त्याला दुजोरा देत संजय राऊतांनी सरकारला सवाल केले आहेत.
“राज्याचे गृहमंत्री काय करतायत?”
“अजित पवारांनी परखडपणे सांगितलंय की या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. परीक्षेला निघालेल्या एका मुलीवर ट्रेनमध्ये असे अत्याचार होत असतील, तर ज्यांच्यावर या सगळ्यांच्या रक्षणाची जबाबदारी आहे, ते राज्याचे गृहमंत्री काय करतायत? कुठे आहेत पोलीस? की पोलीस फक्त ४० गद्दार बेईमान आमदारांच्या संरक्षणासाठीच ठेवलेले आहेत?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
“…तर मग महिलांचं, जनतेचं रक्षण कुणी करायचं?”
“अजित पवारांनी जाहीर केल्याप्रमाणे, ठाण्यात १००हून जास्त असे लोक आहेत ज्यांनी फक्त मिंधे गटात प्रवेश केला म्हणून त्यांच्या रक्षणासाठी किमान एक हजार पोलीस लावले आहेत. कुणाची भीती वाटतेय तुम्हाला? अजित पवारांनी ही यादी लवकरच जाहीर करावी. आम्हीही या यादीची वाट पाहात आहोत. आमच्याकडेही तीच माहिती आहे. फक्त ठाण्यात एक हजाराच्या आसपास पोलीस शिंदेंचे नातेवाई, त्यांच्याबरोबर फुटून गेलेल्या लोकांच्या रक्षणासाठी ठेवले असतील, तर जनतेचं, महिलांचं रक्षण कुणी करायचं हा साधा प्रश्न आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.
“विरोधी पक्षनेत्यांनी उचललेल्या प्रश्नावरून महाराष्ट्रात रान उठवायला पाहिजे. मुंबईत धावत्या लोकलमध्ये अत्याचार होत असतील तर सुरक्षित कोण आहे? फक्त मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि त्यांचे मूठभर नातेवाईक? त्यांना कोण एवढा हात लावतंय? पोलीस महिलांच्या रक्षणासाठी, जनतेसाठी ठेवा ना”, असं संजय राऊतांनी यावेळी बोलताना सांगितलं.