शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटानं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करताच शिंदे गटाकडून न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे न्यायालयीन पातळीवर हा वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता असताना दुसरीकडे राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात २ हजार कोटींचा सौदा झाल्याचा आरोप केल्यानंतर आज माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ हजार कोटींचा आरोप नेमका काय?

निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर हा निकाल देण्यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. या व्यवहारामध्ये शिंदे गटाकडून हा पैसा ओतण्यात आल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे.

“…अशा प्रकारची अश्लील भाषा वापरणाऱ्यांच्या कानाखालीच मारली पाहिजे” संजय राऊतांवर टीका करत संदीप देशपांडेचं विधान!

दोन्ही स्तरावर लढाई लढली जाईल – संजय राऊत

दरम्यान, न्यायालय आणि जनतेच्या न्यायालयातही लढाई लढली जाईल, असं राऊत आज म्हणाले आहेत. “लढाई दोन्ही स्तरांवर लढली जाईल. कायद्याची आणि जनतेतली. आम्ही लढायला सक्षम आहोत. गेल्या ७-८ वर्षांपासून देशात स्वत:ला स्वायत्त, स्वतंत्र म्हणवून घेणाऱ्या संस्था, यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या गुलाम झाल्या आहेत. मात्र, आम्ही लोकांना हे दाखवतोय, की सत्य आणि न्यायाची बाजू ही कशी डावलली जात आहे”, असं राऊत यावेळी म्हणाले.

“न्याय आणि निकाल यात फरक आहे”

“मी काल स्पष्ट सांगितलं आणि आज पुन्हा सांगतो की चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाला. निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा स्वत: देवेंद्र फडणवीस सांगत होते, की निकाल आपल्याच बाजूने लागेल. मिंधे गटाचे लोक, एक केंद्रीय मंत्रीही हाच दावा करत होते. तेव्हाही माझ्याकडे माहिती होती की २ हजार कोटींचा व्यवहार या निर्णयासाठी झाला आहे. त्यामुळे न्याय आणि निर्णय यात फरक आहे. निर्णय हा प्रचंड पैशाचा वापर करून विकत घेण्यात आला”, अशा शब्दांत राऊतांनी शिंदे गट आणि भाजपावर हल्लाबोल केला. “यासंदर्भातले पुरावे लवकरच जाहीर करेन”, असंही राऊतांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानामुळं संजय राऊत अडचणीत; नाशिकमध्ये गुन्हा दाखल

“कोण विरोधक? आम्ही भाजपाचे विरोधक आहोत. आमची लढाई मिंधे गटाशी नसून देश हुकुमशाहीकडे नेणाऱ्या भाजपाशी आमची लढाई आहे.मिंधे गट त्यांचा गुलाम आहे. आमच्याशी लढण्याची त्यांची पात्रताच नाही. म्हणून भाजपानं पैसा मिंध्यांचा आणि यंत्रणा त्यांची अशा पद्धतीने हा न्याय विकत घेतला. तुम्ही शिवसेनेवर हल्ला कराल, त्यांना संपवण्याचा प्रयत्न कराल. पण शिवसेना संपणार नाही. ती अंगार आहे. ती विझणार नाही”, असंही राऊतांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams devendra fadnavis bjp shinde group election commission pmw
Show comments