देशाच्या अर्थसंकल्पावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून अमित शाह यांचा संदर्भ घेत एक मोठं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे संजय राऊत यांची मुळीच दखलही घेत नाहीत. मात्र देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री नाहीत म्हणून एकनात शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केलेलं हे वक्तव्य चर्चेत आहे.
संजय राऊत यांची अर्थसंकल्पावर टीका (What Sanjay Raut Said About Budget? )
महाराष्ट्रासारखं राज्य हे देशाचं पोट भरत आलं आहे. या महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे. अर्थमंत्री म्हणतात महाराष्ट्राच्या जमिनी विकून पैसे देऊ का? ही वेळ राज्यावर आलेली आहे तरीही केंद्र सरकार दखल घेत नाही. आमचाच पैसे घेऊन तोंडावर चिंचोके मारण्याचं काम चाललं आहे. हे किती काळ चालणार? त्यामुळे जनतेला आता विचार करावा लागेल असं संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “आम्ही तुमच्यासारखे ‘जिना फॅन्स क्लब’चे सदस्य…”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर!
देवेंद्र फडणवीस यांचा संदर्भ देत काय म्हणाले संजय राऊत?
“पैशांच्या जोरावर जे बोलतात त्यांना आम्ही उत्तर देत नाही. लोंबड्या-शेंबड्यांना मी उत्तर देत नाही. या महाराष्ट्रात काय चाललं आहे? एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची अवस्था म्हणजे एक फूल दोन डाऊटफुल अशी आहे. यांच्यात जो काही संघर्ष सुरु आहे, तो अख्खा महाराष्ट्र पाहतो. अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, कधीच नव्हते. हे सगळ्यांना माहीत आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळालं कारण त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली. त्यांच्यात काही फार कर्तृत्त्व, कर्तबागारी काही नाही, अनुभवही नाही. दिल्लीला पैशांच्या थैल्या द्यायच्या आणि महाराष्ट्राची अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसण्यासारखी केली आहे. गुजरात व्यापार मंडळाला बिनकण्याचा मुख्यमंत्री हवा असतो त्यापद्धतीने हे काम करत आहेत. दुसरं काय?” असं संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्यावरही टीका
७० हजार कोटीच्या घोटाळ्याची मदत भाजपाला होणार असेल त्यामुळे त्यांनी संघाला सांगितलं आहे की अजित पवारांवर टीका करु नका. त्यांच्या बरोबरचे इतर सहकारी आहेत ज्यांनी मिर्चीचा व्यापार केला, बँकांचे घोटाळे केले अशांच्या मदतीवर राज्य चालणार असेल तर भाजपा आणि त्यांच्या संघ परिवाराला माझा कोपरापासून दंडवत अशीही टोलेबाजी संजय राऊत यांनी केली.