लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय स्तरावर विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये जागावाटप कसं होणार? याविषयी जोरदार चर्चा होत असताना दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचीही चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात बैठका होत असून त्यात नेमकं काय ठरलं? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे चर्चेसाठी दिल्लीला जाणार?

महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसची वेगळी भूमिका असून त्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर पत्रकार परिषदेत प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यावर संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत असं तुम्हाला कुणी सांगितलं? काँग्रेसचे वरीष्ठ नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी उद्धव ठाकरेंचा चांगला संवाद आहे. त्यामुळे जागावाटपाच्या विषयात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही. भविष्यात आम्हाला गरज पडली तर नक्कीच आम्ही दिल्लीत जाऊ. काँग्रेसचा जागावाटपासंदर्भातला विषय आम्ही दिल्लीत बसून सोडवू”, असं संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत बैठकांचं सत्र?

दरम्यान, जागावाटपासंदर्भात दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या बैठका चालू असून लवकरच त्यासंदर्भात माहिती दिली जाईल, असं सुप्रिया सुळेंनी सांगितल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊतांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “सुप्रिया सुळेंनी जर सांगितलंय की महाविकास आघाडीत जागावाटपावर कोणतेही मतभेद नाहीत आणि लवकरच यासंदर्भात घोषणा होईल, तर मी त्याचं स्वागत करतो. आम्ही सगळे एक आहोत. एक-दोन जागांसाठी आम्ही आघाडीत तणाव निर्माण करणार नाही”, असं राऊत यांनी सांगितलं.

“भाजपानं मौन बाळगलं कारण नराधम हिरव्या लुंगीतले नसून…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; ‘त्या’ प्रकरणाचा केला उल्लेख!

“ट्रकचालकांचा संप ही अभूतपूर्व स्थिती”

हिट अँड रन प्रकरणातील शिक्षेच्या तरतुदीवर आक्षेप घेत राज्यात ट्रकचालकांचा संप चालू आहे. यावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिली. “सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. राज्यात गोंधळाची स्थिती आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांवर हल्ले झाले. यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. केंद्राकडे यासंदर्भात चर्चा करणं गरजेचं आहे. हिट अँड रन हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. पण जी परिस्थिती राज्यात उद्भवली आहे, ती अभूतपूर्व आहे. हे प्रकरण चिघळत गेलं, तर सामान्य माणसाला त्याचा त्रास सहन करावा लागेल”, असं ते म्हणाले.

काँग्रेसचे अनेक लोक भाजपामध्ये येणार असल्याचं विधान भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं. त्यावर राऊतांनी खोचक टोला लागावला आहे. “त्यांनी अनेक पक्ष बदलले. ते शिवसेनेत होते, ते काँग्रेसमध्ये होते, आता भाजपात आहेत. पक्षांतराची ज्यांना चाड नसते, असे लोक अशी वक्तव्य करत असतात. त्यांच्याविषयी मी काय बोलणार? कोण जातंय, कोण राहतंय हे येणारा काळ ठरवेल. उद्या भाजपा सत्तेत नसेल, तर आपण कुठे असाल हाही विचार करून ठेवा”, असा खोचक सल्ला राऊतांनी विखे पाटलांना दिला.