‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात सुरू असलेल्या वादावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यासंदर्भात निर्वाळा दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यासंदर्भात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून आयोगाने पक्षपातीपणा करू नये, यासाठी आमचा लढा असल्याचं ते माध्यमांना म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली उच्च न्यायालयात काय घडलं?

‘शिवसेना’ हे पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने गोठवलं होतं. आता अंधेरी पोटनिवडणूक झाली असून त्यात ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा विजयही झाला आहे. यानंतर ठाकरे गटाने पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह आयोगाने गोठवण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून आयोगाने यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले आहेत.

“आम्हाला गुंतवून ठेवण्याचं हे षडयंत्र”

दरम्यान, यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “उच्च न्यायालयाने आमची याचिका फेटाळली आहे. पण आम्हाला न्यायालयीन लढाईन अशा प्रकारे गुंतवून ठेवण्याचं हे षडयंत्र आहे. तरीही शिवसेना आणि आमचे सहकारी ती लढाई नेटाने लढत आहेत. आमची एक याचिका फेटाळली आहे. पण जिद्द आणि लढा कायम आहे. उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. फक्त आयोगाने पक्षपात करू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”, असं संजय राऊत म्हणाले.

Shivsena Party Symbol: ठाकरे गटाला मोठा धक्का! दिल्ली हायकोर्टाने फेटाळली याचिका

“देशात दबावाचं राजकारण”

“उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला हेही सांगितलं आहे की लवकरात लवकर निर्णय घ्या. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय या सर्व ठिकाणी जाऊन न्यायाची मागणी करण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत. पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशात कशा प्रकारे दबावाचं राजकारण सुरू आहे. पण आम्ही निवडणूक आयोगाकडे पुन्हा जाऊ”, असं राऊत म्हणाले.

“ते निवडणूक लढलेच नाहीत, तरीही…”

“उच्च न्यायालयाने म्हटलं की हा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हेच सांगितलं होतं. पण ज्या कारणासाठी आमचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, ते कारण काय होतं? जो गट आमच्यातून फुटून निघाला, त्यांचा दावा होता की ते अंधेरी पोटनिवडणूक लढणार आहेत, यासाठी त्यांना धनुष्यबाण चिन्ह हवं. पण ते निवडणूकच लढले नाहीत. तरीही आमचं चिन्ह गोठवलं आहे. त्यासंदर्भात ही याचिका आहे”, असंही संजय राऊतांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams election commission on delhi high court rejects shivsena plea pmw