शिवसेनेच्या ठाकरे गटाची (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) जळगावात वचनपूर्ती सभा नुकतीच पार पडली. या सभेला पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित आहेत. या सभेला संबोधित करताना खासदार संजय राऊत यांनी जळगावातील बंडखोर शिवसेना आमदारांसह (शिंदे गट) भारतीय जनता पार्टीवर टीका केली. यावेळी संजय राऊत म्हणाले, लोक म्हणत होते जळगावातली शिवसेना संपली, परंतु ते चार टकले म्हणजे शिवसेना आहे का?
खासदार संजय राऊत म्हणाले, अनेकांना आजच्या सभेची चिंता वाटत होती. या सभेला गर्दी होईल की नाही याची काहींना काळजी वाटत होती. कारण काही लोक सारखं सारखं म्हणायचे की, जळगावची शिवसेना गेली, जळगावातली शिवसेना संपली, अरे चार टकले गेले म्हणून शिवसेना संपली का? ते चार टकले म्हणजे शिवसेना आहे का? खरी शिवसेना ही आपल्यासमोर या गर्दीत आहे. ही पाहा संपूर्ण जळगावातली शिवसेना.
संजय राऊत म्हणाले, आम्ही इथे येऊ नये, उद्धव ठाकरे यांनी इथे येऊ नये, छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांचं अनावरण हे देशभक्त आणि स्वाभिमानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊ नये म्हणून या चार टकल्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण आम्ही आलो, उद्धवजी आले, त्यांचं भव्य स्वागत झालं, त्यांनी पाहिलं आणि जिंकलं. हजारोंच्या संख्येने इथे लोक जमले आहेत. आजच्या या सभेने त्या चार टकल्यांना धडकी भरली असेल. उद्यापासून ते बाहेर पडणार नाहीत.
संजय राऊतांनी या वक्तव्याद्वारे प्रामुख्याने पाणी पुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (शिवसेनेचे सहयोगी आमदार) या नेत्यांकडे संजय राऊतांच्या टीकेचा रोख होता असं बोललं जात आहे.
हे ही वाचा >> “आता भारत बोललं पाहिजे, इंडिया बोलल्यावर…”, ठाकरेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल; म्हणाले, “तकलादू पुरूष…”
दरम्यान, संजय राऊत म्हणाले, या महाराष्ट्राचा सेनापती उद्धव ठाकरे राज्याचं नेतृत्व काल करत होते आणि उद्याही करतील. भविष्यात या देशाची जबाबदारी त्यांच्यावर पडली तर आश्चर्य वाटायला नको