कर्नाटकचे मुख्यमंत्र बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांवरून केलेल्या विधानांमुळे आणि ट्वीटमुळे हा प्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. बेळगाव, निपाणीसह सीमाभागातील काही गावे महाराष्ट्रात असावीत की कर्नाटकमध्ये, यावरून दोन्ही राज्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नसताना आता कर्नाटक सरकारने थेट सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातली ४० गावं आपल्या हद्दीत घेण्याची तयारी सुरू केली आहे. असा दावा कर्नाटक सरकार करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाच धमकी दिली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोन दिवसांपूर्वी सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वकिलांच्या एका समितीची स्थापना केली आहे. या समितीवर सीमाप्रश्नी तोडगा काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने एकही गाव कर्नाटकमध्ये जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर त्यावरून बोम्मई यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीकास्र सोडलं आहे. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केलं असून, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे”, असं ट्वीट बोम्मई यांनी केलं आहे.
“कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या समाविष्ट केले पाहिजेत”, असा दावाही बोम्मई यांनी ट्वीटमध्ये केला आहे.
दरम्यान, बोम्मई यांच्या या ट्वीटचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोम्मई सरकारवर टीकास्र सोडलं आहे. तसेच, बसवराज बोम्मई यांना जाहीरपणे इशाराही दिला आहे.
“महाराष्ट्राचं सरकार कमजोर, मिंधे, दुर्बल असेल. पण आजही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रावर आलेलं प्रत्येक संकट परतवून लावेल. १०६ हुतात्मे झाले आहेत. आम्ही आणखीन हुतात्मे देऊ. रक्त सांडू. आम्हाला तुरुंगाची भीती नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, ज्यानं ६९ हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगलाय, आम्हीही भोगू. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मी शिवसेनेकडून इशारा नाही देत, धमकी देतोय समजा. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. ‘हे घेऊ, ते घेऊ’ ही तुमची बकबक बंद करा. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. आमचं सरकार जरी सिलेंडर वर करून गुडघ्यावर बसलं असलं, तरी शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे हे विसरू नका”, अशा शब्दांत राऊतांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.