माजी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे. तर किरीट सोमय्या यांनी या व्हिडीओच्या चौकशीची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांच्यावर प्रामुख्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते टीका करत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यापाठोपाठ आता खासदार संजय राऊत यांनीही सोमय्या यांचं नाव न घेता सूचक ट्वीट केलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की आमच्यावर आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. आता नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरंच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावे.. जय महाराष्ट्र! या ट्वीटवर राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मेन्शन केलं आहे. राऊत यांनी यात ट्वीटमध्ये सोमय्या यांचा उल्लेख केलेला नाही. परंतु या ट्वीटवर सोमय्या प्रकरणाशी संबंधित कमेंट्स दिसत आहेत.
हे ही वाचा >> “किरीट सोमय्या नग्न झाले, पेन ड्राईव्ह घेऊन सभागृहात…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल
किरीट सोमय्या यांचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तिंनी माझ्यावर अनेक आरोप केले आणि आक्षेप घेतले आहेत. अशा प्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आलं आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स त्यांच्याकडे आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी.”