संजय राऊतांवर सातत्याने टीका करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आज संजय राऊतांनी पुन्हा एकदा परखड टीका केली आहे. “मी पुन्हा एकदा तो शब्द वापरतोय, किरीट सोमय्या चु*** आहे”, असं म्हणताना संजय राऊतांनी सेव्ह आयएनएस विक्रांत घोटाळ्यावरून किरीट सोमय्यांवर टीकास्त्र सोडलं. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर संजय राऊत मुंबईत परतल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपा आणि किरीट सोमय्या यांच्यावर आगपाखड केली.
“राजभवन भाजपाची शाखा, राज्यपाल शाखाप्रमुख”
आपल्यावरील आरोपांचे पुरावे मागणाऱ्या किरीट सोमय्यांवर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. “तो माणूस काय पुरावे मागतोय. स्पष्ट दिसतंय पैसे गोळा केलेत. पैसे गोळा करतोय, पैसे घेण्याचं आवाहन करतोय. त्याने ७११ डबे फिरवले. ते भरेपर्यंत फिरवले. ते डबे मुलुंडला नीलम नगरला गेले. त्यातले अर्धे डबे जुहूला एका कार्यालयात गेले. ते पैसे बाहेर काढले. पीएमसी बँकेच्या माध्यमातून बंदे केले. आर्थिक घोटाळा केला. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी, ते पैसे राजभवनात जमा करू असं त्यांचं धोरण होतं. राजभवन ही भाजपाची शाखा आहे. राज्यपाल त्यांचे शाखाप्रमुख आहेत. त्यांनीच पत्र दिलंय मला की हे कोट्यवधी रुपये जमा झालेत, ते आमच्याकडे आलेच नाहीत. या मधल्या काळात ते पैसे कुठे गेले? हे मी तुम्हाला सांगितलं. आता यापेक्षा काय पुरावा असतो, ते या मूर्ख माणसानं सांगावं”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“हा देशद्रोहाएवढाच मोठा गुन्हा”
“राजभवनातूनच हे पुरावे आले आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती देशद्रोहाच्याच गुन्ह्याएवढी आहे. देशभरातून किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने पैसे गोळा केले आहेत. त्यामुळे सेव्ह आयएनएस विक्रांत घोटाळ्याविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल होत आहेत. राज्यसभाही आज या विषयावर बंद पडली आहे”, असं राऊतांनी यावेळी नमूद केलं.
मुंबईत येताच संजय राऊतांचं भाजपाला आव्हान; म्हणाले, “ठिणगी पडली आहे, यापुढे…!”
“सोमय्यांची मती भ्रष्ट झाली आहे”
दरम्यान, शरद पवारांच्या संदर्भात करण्यात आलेल्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का? मी शिवसेनेत असतानाही माझे शरद पवारांसोबत घनिष्ट संबंध आहेत. म्हणून तर मी हे सरकार आणू शकलो ना? त्यांना तेच तर दु:ख आहे. काल शरद पवार माझ्यासाठी पंतप्रधानांना भेटले. किरीट सोमय्यांची मती भ्रष्ट झालीये हे माहितीये. पण एवढी भ्रष्ट झाली असेल, तर राज्यातल्या जनतेला त्यांच्या मानसिकतेबाबत शंका आहे”, असं संजय राऊत म्हणाले.