ईडीनं आज संजय राऊत यांच्या अलिबागमधील प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांमध्ये संजय राऊतांवर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर आजच्या कारवाईनंतर किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर परखड शब्दांत टीका केली होती. सोमय्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांची जीभ घसरली आणि त्यांनी आक्षेपार्ह भाषेत किरीट सोमय्यांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केला.

सोमय्यांचा खोचक टोला!

“संजय राऊत यांना आधीच लक्षात आलं म्हणून त्यांनी १० महिन्यांपूर्वी ईडी कार्यालयात जाऊन ५५ लाख रुपये परत केले होते. ईडीची काही दिवस कारवाई सुरू होती. आमच्याकडे देखील माहिती येत होती. गेले दोन महिने संजय राऊत यांची धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या, नील आणि मेधा सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो,” असं किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं भाजपाला आव्हान; म्हणाले, “…तर सगळी मालमत्ता भाजपाला दान करू!”

दरम्यान, किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यांचा एकेरी उल्लेख करत राऊत म्हणाले, “किरीट सोमय्या चु*** आहे. महाराष्ट्रद्वेष्टा आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? कोण आहे तो?” असं राऊत म्हणाले.

“अशा कारवायांनी संजय राऊत झुकणार नाही”

“अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं”, असं राऊत यावेळी म्हणाले आहेत.

“मी तुमच्या बापाला घाबरत नाही”

दरम्यान, आजच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. “तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली कशा काम करत आहेत हे तुम्ही पाहात आहात. संपत्ती म्हणजे एखाद्याचं राहातं घर असेल, कष्टाच्या पैशातून जुनी संपत्ती घेतली असेल, त्याचा संबंध कुठेतरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा. मी तुमच्या बापाला घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे हे लक्षात घ्या. आजही मला त्यांचे आशीर्वाद आहेत”, असं राऊत म्हणाले.

Story img Loader