Sanjay Raut : शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी रविवारी बुलढाण्यात एका जाहीर सभेत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. सभेत बोलताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट मतदानांचा पैशांसाठी विकले गेलेले म्हटलं. संजय गायकवाड एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी “तुमच्यापेक्षा तर रांxx बऱ्या” असं गंभीर विधान केल्यामुळे त्यावरून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. आता खासदार संजय राऊत यांनीही यावरुन टीका केली आहे.
मतदारांना वेश्या आणि लोकशाहीला रखेल म्हणत असेल तर…
मतदारांना जर कुणी वेश्या म्हणत असेल आणि लोकशाहीला रखेल म्हणत असेल आणि संविधानाला कुणी गुलाम मानत असेल तर देवेंद्र फडणवीस यांची ती जबाबदारी आहे. मतदार दोन-दोन हजारांना विकत घेतले म्हणणं, मतदारांना वेश्या म्हणणं, अश्लील म्हणणं याबाबत विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी मत व्यक्त केलं पाहिजे. मतदारांना विकत घेण्यात आलं हे सरळ आमदार म्हणत आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटेंवरही टीका
महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं मतदान केलं आहे त्याचा पोलखोल या आमदाराने केला आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लाडकी बहीण योजनेचं कसं ओझं सरकारवर आहे? ते सांगितलं. दोन लाख कोटींचं कर्ज झालं आहे. अशा योजना म्हणजे सरकारवर ओझं असं म्हणत भूमिका मांडली आहे. आता सरकारी तिजोरीवर भार टाकणं तुम्हाला जमत नाही. मात्र शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांचं वक्तव्य मी गंभीर मानतो. कोट्यवधी मतदारांना जर कुणी वेश्या म्हणत असेल तर एकनाथ शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पैसे देऊन मतदान घेतलं असेल, चला मी मान्य करतो पण तुम्ही त्यांना वेश्या कसं काय म्हणता? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय गायकवाड यांच्या विधानावर संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे अजित पवारांचंही विधान चर्चेत आलं आहे. बारामतीमध्ये एका पेट्रोल पंपाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन दिले जात होते. त्यानंतर अजित पवारही ते निवेदन घेत कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत होते. मात्र, याचवेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाले नसल्याचं म्हटलं. त्या कार्यकर्त्याच्या विधानानंतर अजून काही नागरिकांनीही तसंच म्हटलं. यानंतर अजित पवार हे काहीसे संतापले आणि म्हणाले, “अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केला. याबाबतही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांवर मी काही बोलणार नाही
अजित पवार जे म्हणाले की तुम्ही मला विकत घेतलेलं नाही. ज्यांनी त्यांना मतदान केलं त्या मतदारांच्या भावना आहेत. आम्ही याबाबत काहीही बोलणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.