बुधवारी संध्याकाळी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मनसेचा १७ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली राजकीय टोलेबाजी चर्चेचा विषय ठरली आहे. विशेषत: त्यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रकपरणात मनसे कार्यकर्त्यांवर हजारो केसेस दाखल केल्या आणि नंतर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं, अशा आशयाचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. त्यावर संजय राऊतांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरेंनी गडकरी रंगायतनमध्ये केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं. “पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर काढण्याचं काम मनसेनं केलं. बाकीचे हिंदुत्ववादी लोक कुठे होते? काय करत होते? चिंतन! बाकीचे म्हणतात आम्ही हिंदुत्वाला मानतो, म्हणजे काय करता? तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं? नुसती जपमाळ? प्रत्यक्ष कृतीत तर कधी दिसत नाही ते. भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलवलं. विरोध करणारे हिंदुत्ववादीच. मला आतलं राजकारण कळलं होतं. म्हणून मी म्हटलं तूर्तास नको, आत्ता हे राजकारण नको. आणि ज्यांनी हे केलं, त्यांचं काय झालं? असंच असतं. म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कुणी”, असं राज ठाकरे म्हणाले.
“भोंग्याच्या प्रकरणात महाराष्ट्रभर १७ हजार केसेस दाखल झाल्या. मी म्हणालो ना, वाट्याला जायचं नाही. मुख्यमंत्रीपदावरून जावं लागलं”, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.
तेवढा तुमचा पक्ष मोठा नाही – संजय राऊत
दरम्यान, यावर संजय राऊतांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “कुणी कुणाच्या वाट्याला गेलेलं नाही. त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार किंवा मुख्यमंत्रीपद का गेलं हे आख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहिती नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं. आणि जोडीला खोके”, असं संजय राऊत म्हणाले.
वाचा राज ठाकरेंचं ठाण्यातलं संपूर्ण भाषण!
“ईडी काय आहे हे काही मी मनसे प्रमुखांना वेगळं सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे. फक्त इडीचा अनुभव आम्ही घेऊनही आमच्या तोफा आणि कार्य चालू आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.
“तुम्ही तुमचं काम करा”
“शिवसेनेनं कधीही हिंदुस्व सोडलेलं नाही. कोण काय म्हणतं त्यावरून शिवसेनेची भूमिका ठरत नाही. तुम्ही तुमचं काम करा. शिवसेनेनं नेहमी महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टी आपल्यासोबत ठेवल्या आहेत. हिंदुत्वावर शिवसेनेनं कधीही तडजोड केलेली नाही हे सगळ्यांना माहिती आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी राज ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उत्तर दिलं आहे.