गेल्या दोन दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापू लागला आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान ओरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवल्यामुळे त्यावरून मोठा राजकीय वाद सुरू झाला आहे. यासंदर्भात ओवेसींवर टीका होत असताना त्यावरून राज्य सरकारला देखील भाजपाकडून टीके केली जात आहे. “हनुमान चालीसा वाचण्याबद्दल राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला, तर मग आता ओवेसींवर देखील राजद्रोह का दाखल केला जात नाही?” असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर तोंडसुख घेतलं आहे.

शिवनसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार असून त्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “ही सभा ऐतिहासिक आहे. विरोधकांच्या मनातल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देणारी असेल. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचा, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबाबत उद्धव ठाकरे परखडपणे बोलतील”, असं राऊत म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत सुरू असलेल्या वादावर देखील भूमिका मांडली.

“कबर आत्ताच दिसली का?”

औरंगजेबाची कबर विरोधकांना आत्ताच दिसली का? असा सवाल संजय राऊतांनी भाजपाला विचारला आहे. “तुम्हाला ती कबर आत्ताच दिसतीये का? तुमचं राज्य होतं ना ५ वर्ष? तेव्हाच टाकायची ना उखडून. तुम्हाला ते बेकायदेशीर वाटतंय, तर करा तिथे काय करायचं ते. आताही ते करू शकतात. केंद्र सरकारच्या अखत्यारीतली वास्तू आहे ती”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रात विरोधी पक्षांचा नंगानाच…”, उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा भाजपावर निशाणा!

हिंदुत्वावरून राज ठाकरेंवर टोला

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंवर टोला लगावला आहे. “आम्ही काय पहिल्यांदा अयोध्येला जात नाही आहोत. आम्ही काय आत्ता शाल अंगावर नाही घेतली. हिंदुत्वाची शाल बाळासाहेबांनी ४०-५० वर्षांपूर्वी घेतलीये. उद्धव ठाकरेंनी आत्ता हिंदुत्व स्वीकारलेलं नाही. ते जन्मत:च आहे. आमचा अयोध्येतल्या आंदोलनात सहभाग होता. त्यासाठी प्रमाणपत्र दाखवायची गरज नाही आम्हाला”, अशा शब्दांत संजय राऊतांनी सुनावलं आहे.

“शिवसेनेला कधीही अग्निपरीक्षा द्यावी लागलेली नाही. हिंदुत्वाच्या अग्निपरीक्षा शिवसेनेने कधीच पार केलेल्या आहेत. गेल्या ३० वर्षांपासून शिवसेना हिंदुत्वावरच बोलतेय. बाकी सगळे उपरे आहेत. ते तात्पुरते आहेत”, असंही ते म्हणाले.

Story img Loader