Sanjay Raut on Attacks on Hindus in Bangladesh : बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यापासून तिथे हिंदूंसह अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील अत्याच्याराच्या बातम्यांनी जग हादरून गेलं आहे. तिथे हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू धर्मियांवर सातत्याने हल्ले होत आहेत. यामुळे बांगलादेशमधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहेत. यात तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेबरोबर बांगलादेश मधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भारतातील सामान्य जनता व विरोधी पक्ष सरकारकडे करत आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी देखील हीच मागणी लावून धरली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका देखील केली.
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. तिथल्या हिंदूंसाठी लढणारे, त्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे चिन्मय दास यांना तिथल्या सरकारने तुरुंगात डांबून ठेवलं आहे. हिंदूंची बाजू लावून धरतील अशा वकिलांच्या हत्या होत आहेत. बांगलादेशमध्ये असं सगळं घडत असताना स्वतःला हिंदूंचे नेते संबोधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीच कसं वाटत नाही? तिथली परिस्थिती पाहून मोदी व अमित शाह यांचं मन विचलित होत नसेल, केवळ सचिव स्तरावरच या चर्चा सुरू असतील तर मला वाटतं की मोदी आणि शहांची हिंदूंबाबत केवळ भोंदूगिरी चालू आहे. ते हिंदूंबद्दल जे काही बोलत आहेत ते ढोंग आहे. केवळ मतांसाठी हिंदूंच्या नावाचा गजर करत असतात. अशीच घटना पाकिस्तानात घडली असती तर एव्हाना नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवर उभं राहून भाषण केलं असतं. पाकिस्तानात घुसून मारू, अशी भाषा केली असती. वेगवेगळ्या घोषणा करून वातावरण निर्मिती केली असती. परंतु, आता निवडणुका नाहीत आणि मोदी शहांना बांगलादेशमध्ये निवडणूक लढायची नाही. म्हणून ते सगळे स्वस्थ बसले आहेत. त्यामुळे हिंदू मेला तरी त्यांना काही फरक पडत नाही. बांगलादेशमध्ये निवडणुका लढायच्या असत्या किंवा भारतात निवडणुका असत्या तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”.
हे ही वाचा >> Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
संजय राऊत म्हणाले, “काश्मीरमध्ये हल्ले झाल्यानंतर तेव्हा भारतात सचिव पातळीवर चर्चा का झाल्या नाहीत? बांगलादेशमधील हिंदूंचा प्रश्न मोदींसाठी महत्त्वाचा नाही का? हिंदूंवरील हल्ले हा देशाचा विषय आहे. त्यामुळेच देशभर उग्र आंदोलनं चालू आहेत. परंतु, या आंदोलनात भारतीय जनता पार्टी कुठेच नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेच नाही. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा सर्वच राज्यांमध्ये आंदोलनं चालू आहेत. पश्चिम बंगालमधील नागरिकांनी ढाक्यातून येणाऱ्या साड्यांची होळी केली आहे. कारण तिथे भयावह स्थिती आहे. तिथे उरलेल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हे हिंदू फाळणीनंतर तिकडेच राहिले होते. परंतु, त्या हिंदूंसाठी मोदी काहीच बोलत नाहीत. भारताच्या संसदेत त्या विषयावर शब्द काढत नाहीत. मोदी मणिपूरला जात नाहीत आणि वरून जगभर हिंदूंचे नेते असल्याची बढाई मारतात”.