पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) शिर्डीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केलं गेलं आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते (शरद पवार) केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषीमंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात (केंद्रीय कृषीमंत्री म्हणून) देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत १३.५ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले.”
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शरद पवारांवरील टीकेला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले, कृषीमंत्री म्हणून शरद पवारांनी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातला जेवढी मदत केली तेवढी मदत आत्ताही होत नसेल. भाजपा किती दुतोंडी आहे त्याचा हा उत्तम नमुना आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन शरद पवारांचं कृषी क्षेत्रातील योगदान किती मोठं आहे ते सांगितलं होतं. देशाला अन्नधान्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी, शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शरद पवारांनी काय केलं हे स्वतः बारामतीत येऊन सांगणारे, शरद पवार हे माझे राजकीय गुरू आहेत असं म्हणणारे नरेंद्र मोदी आज विचारतायत शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?
हे ही वाचा >> “हे पाहून वाईट वाटलं”, पंतप्रधानांच्या शरद पवारांवरील टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला
संजय राऊत म्हणाले, तुम्ही (नरेंद्र मोदी) शेतकऱ्यांसाठी काय केलं? महाराष्ट्रात गेल्या १० वर्षात म्हणजेच तुमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. देशभरात शेतकरी मरतोय. त्यांना मारण्यासाठी तुम्ही तीन काळे कायदे आणले. मग शेतकरी रस्त्यावर उतरला. एक वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी दिल्लीच्या सीमेवर, रस्त्यांवर धरणे आंदोलन करत होता. हे मोदी सरकारचं अपयश आहे. तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होता. परंतु, त्यांचं जेवढं उत्पन्न होतं तितकंसुद्धा राहिलं नाही. तुम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या नाहीत.