Sanjay Raut on PM Narendra Modi: शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीपेक्षा वरिष्ठ आहेत. पंतप्रधान पदावर कुणी बसला म्हणजे तो श्रेष्ठ आणि ज्येष्ठ होत नाही. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते. त्यामुळे मला असे वाटले होते की, पंतप्रधान मोदी पवारांच्या बाजूला बसणार नाहीत. भटकती आत्म्याच्या बाजूला पंतप्रधान कसे काय बसू शकतील? पीएमओने त्यांना कसे काय बसू दिले? असा सवाल शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर काल दोन-चार मिनिटांसाठी जे काही झाले, तो एक व्यापार आणि ढोंग होते, अशीही टीका त्यांनी केली आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) दिल्लीतील विज्ञान भवन येथे झाले. खासदार शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटक होते.

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार हे साहित्य संमेलनाच्या मंचावर एकमेकांच्या शेजारी बसले होते. शरद पवार भाषण आटोपून आपल्या जागेवर येत असताना पंतप्रधान मोदींनी उठून त्यांना बसायला खुर्ची मागे घेतली. तसेच बसल्यानंतर शरद पवारांना पाणी प्यायला दिले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पंतप्रधान मोदींच्या शिष्टाईचे भाजपाकडून कौतुक केले जात आहे.

या प्रसंगावर टीका करताना खासदार संजय राऊत म्हणाले, “आदर, सन्मान आणि मान याबद्दल बोलले जात आहे. पण हे एक दाखविण्यापुरते व्यापार आणि ढोंग असते. मोदींना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी फार आदर आहे, असे ते नेहमी भाषणात सांगतात. पण बाळसाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना त्यांनी अगदी निर्दयीपणे फोडली. शरद पवारांचा कष्टातून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला. मग कसला आदर आणि सन्मान… ‘देखल्या देवा दंडवत’, अशी मराठीत एक म्हण आहे, त्याप्रमाणे कालचा प्रसंग होता.”

संजय राऊत पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे उजवे हात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन म्हणाले की, शरद पवार यांचे देश आणि राज्यासाठी योगदान काय? असा त्यांनी प्रश्न विचारला. काका आणि पुतण्याने महाराष्ट्र लुटला, असे नरेंद्र मोदीच म्हणाले. आता पुतण्या त्यांच्याच व्यासपीठावर आहे. स्वतः काकांसाठी पंतप्रधान मोदी खुर्ची ओढत होते, प्यायला पाणी देत होते. याला आम्ही ढोंग म्हणतो. ज्यांच्याविषयी खरा आदर आहे, त्यांच्याविरोधात राजकारण होत नाही. काल मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर दोन-चार मिनिटांसाठी का होईना पण एक व्यापार झाला. महाराष्ट्राने ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

Story img Loader