महाराष्ट्र विधानसभेतील आमदार अपात्रतेसंदर्भात येत्या दोन आठवड्यांत सुनावणी घेऊन माहिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. यानंतर ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी याआधीच वेळकाढूपणा केला जात असल्याचीही टीका विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राहुल नार्वेकर अचानक दिल्लीत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत परखड शब्दांत टीका केली.
“विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेसंदर्भात काय निर्णय घ्यावा यासाठी भाजपा मुख्यालयात, दिल्लीत यावं लागलं असेल, तर आमच्या मनात ज्या शंका आहेत, त्यांना बळ मिळतंय. गेल्या अनेक महिन्यांपासून हा घटनात्मक पेच त्यांनी वाढवून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट असताना त्यांनी वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारलं”, असं संजय राऊत म्हणाले.
“अजूनही वेळकाढूपणा चालू असेल तर..”
“आता ८ दिवसांत तुम्ही कारवाईला सुरुवात करा हे स्पष्ट निर्देश असताना अजूनही त्यांचं वेळकाढूपणाचं धोरण संपलं नसेल, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रात मान मिळत नाही, विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करत नाहीत असं स्पष्ट होतं. न्यायालयाने सांगितलं की आम्ही तुमचा आदर केला, तुम्ही आमचा आदर करा. हा न्यायालयाचा मोठेपणा आहे. बघुयात काय होतंय”, असं संजय राऊत म्हणाले.
“नीलम गोऱ्हेंसमोर सुनावणी नको”
दरम्यान, यावेळी विधानपरिषदेतील आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यासमोर घेतली जाऊ नये, अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. यासंदर्भात विचारणा केली असता संजय राऊतांनी त्यांच्यावर खोचक टीका केली.
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”
“ज्या बाईच फुटून गेल्या आहेत, त्यांच्यासमोर सुनावणी घेणं हा सरळ सरळ निकाल लागल्याचाच विषय आहे. त्या अजिबात तटस्थ नाहीयेत. त्यांनी बाजू बदलली आहे. कालपर्यंत त्या आमच्याबरोबर होत्या. पण पद वाचवण्यासाठी त्या दुसऱ्या पक्षात गेल्या. विचारसरणी वगैरे गोष्टी त्या मानत नाहीत. अशावेळी आम्ही ही भूमिका घेतली असेल, तर ती तर्कसंगत आहे. आम्ही म्हणतो की राहुल नार्वेकरांना पक्षांतराचा इतका अनुभव आहे की पक्षांतर हे घटनाबाह्य आहे, ते चुकीचं आहे हा विचार त्यांच्या डोक्यातच येऊ शकत नाही”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
आरोग्य खात्याच्या ‘त्या’ जाहिरातीवर टीका
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा फोटो असणारी एक पानभर जाहिरात गुरुवारी देशातील अनेक प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये झळकली. राजकीय वर्तुळात यावरून आरोप-प्रत्यारोप चालू असताना संजय राऊतांनी यावरून तानाजी सावंत यांना सल्ला दिला आहे. “ही पैशांची उधळपट्टी आहे. आरोग्यखात्यानं असे काय दिवे लावले? महाराष्ट्राच्या आरोग्यखात्यानं करोना काळात केलेलं आदर्श काम होतं. त्या कामाची तुलना कुणाशीही होणार नाही. त्यांचं मन जर मोठं असेल, तर त्यांनी केल्या साडेतीन वर्षांत आरोग्य खात्यानं केलेल्या कामाचीही जाहिरात देशभरात केली पाहिजे”, असं ते म्हणाले.