शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. याप्रकरणी निकाल देण्यास दिरंगाई केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच हे प्रकरण निकाली काढण्यास नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. परंतु, निकाल वेळेत देता येणार नसल्याने नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली आहे. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून नार्वेकर यांचा डमरू वाजवण्याचा खेळ चालू आहे.
खासदार राऊत म्हणाले, नार्वेकर डमरू वाजवण्याचा खेळ करत आहेत. मी याआधी एकदा म्हणालो होतो, की विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या नार्वेकरांनी आतापर्यंत पाच वेळा पक्ष बदलला आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी जे आम्हाला निकाल देणार आहेत त्या व्यक्तीनेच पाचवेळा पक्षांतर केलं आहे. या राज्यातला एकही पक्ष असा नाही ज्या पक्षात ते गेले नाहीत. त्यांना कोणती विचारधारा आहे? कोणती भूमिका आहे? यांच्याकडून आम्ही नैतिकता, कायदा आणि शिस्तीचे धडे घ्यायचे का? दिल्लीच्या आदेशाने यांचं कामकाज चालतं.
संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले यांनाही टोला लगावला. आमदार अपात्रतेच्या सुनावणीवेळी भरत गोगावले यांना ठाकरे गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारला की तुम्ही सुरतला कशासाठी गेला होता? त्यावर गोगावले म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते. म्हणून आम्हीदेखील ते पाहायला गेलो होतो.” गोगावले यांच्या या वक्तव्यावरून राऊत यांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटायला गेले होते आणि तुम्ही चाटायला…मी इतकं स्पष्ट सांगेन.
दरम्यान, आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी (१३ डिसेंबर) झालेल्या उलटतपासणीवेळी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं की, बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पक्षाची घटना बनवली होती. परंतु, त्यानंतर ती पाळली गेली नाही. तसेच जुलै २०२२ मध्ये निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्षात मुख्यनेता पदाची घटनादुरूस्ती करण्यात आली.