महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच शिंदे गटाचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी लोकसभेत आणि नंतर पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू झाला आहे. राहुल शेवाळेंचे आरोप संसदेच्या कामकाजातून काढून टाकले असले, तरी त्यानंतर ठाकरे गटाकडून शेवाळेंच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल शेवाळेंच्या आरोपांवर हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“स्वत:वरच बलात्काराचे आरोप असणाऱ्यांनी…”

“ज्यांच्यावर स्वत:वरच बलात्कारापासून विनयभंगाचा आरोप आहे, जो कालपर्यंत शिवसेनेच्या ताटत जेवत होता अशा व्यक्तीने आदित्य ठाकरेंवर असे आरोप केले. म्हणजे जे फुटीर लोक आहेत ते किती खालच्या थराला गेले आहेत, किती वैफल्यग्रस्त आहेत हे स्पष्ट दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपूरच्या विधानसभेत सरकारवर आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांवर भूखंड भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत. त्यांना तोंड देताना सरकारची धावपळ आणि पळापळ सुरू आहे. त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप कुणी करत असेल, तर ते भ्रमात आहेत”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“हे सरकार औटघटकेचं”

“हे सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेवर आलं. ते भ्रष्टाचाराच्या ओझ्यानंच पडेल. तुम्ही आमच्यावर असे कितीही आरोप केले, माझ्यासारख्या माणसावर कितीही खोटे खटले दाखल केले, आमची माणसं फोडण्याचा प्रयत्न केला, तरी शिवसेना आणि शिवसैनिक खचणार नाही. मागे हटणार नाही. जे हा खेळ सध्या करत आहेत, त्यांचं राज्य औटघटकेचं आहे. या सगळ्यांना पश्चात्ताप होईल”, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: आदित्य ठाकरेंवरील आरोप लोकसभा कामकाजातून वगळले, शेवाळेंनी नेमके काय आरोप केले?

“राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठी भाषेत हलकटपणा आणि नीचपणा म्हणतात. सुशांतसिंह राजपूत प्रकरण हे तेव्हाच्या विरोधी पक्षानं आम्ही सत्तेत असताना आशा प्रकारे उभं केलं आणि शेवटी ते त्यांच्यावरच उलटलं. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक तपास यंत्रणांनी केला. सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्याच होती हे सीबीआयनं सांगितलं आहे”, असंही राऊत म्हणाले.

शेवाळेंनी काय आरोप केलेत?

राहुल शेवाळेंनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. “रिया चक्रवर्तीच्या फोन कॉल्सचा तपास केला गेला का? किंवा ती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्याच्या संपर्कात होती, त्यांच्यात मैत्री होती, हे खरं आहे का? बिहार पोलिसांच्या तपासात ‘एयू’चा उल्लेख करण्यात आला. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘एयू’ संपर्क क्रमांकावरून ४४ फोन कॉल आले. ‘एयू’चा अर्थ ‘अनन्या उद्धव’ असा काढण्यात आला. पण बिहार पोलिसांनी केलेल्या तपासात ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा काढण्यात आला आहे, याचाही तपास व्हायला हवा”, असा दावा शेवाळेंनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams rahul shevale on aaditya thackeray sushant singh rajpur death pmw