शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांमधील नेते सातत्याने एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी ठाकरे पिता-पुत्रावर एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. रामदास कदम म्हणाले, “आदित्य ठाकरेंवर मी बोलणं योग्य होणार नाही. मी उद्धव ठाकरेंवर बोलेन. मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही. आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप आमदार, खासदार, मंत्री, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भेटही घेत नव्हते. परंतु, आता एकनाथ शिंदेंनी त्यांना असं कामाला लावलंय की बापही पळतोय आणि बेटाही पळतोय.”
रामदास कदम यांच्या या टीकेला आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी संजय राऊत म्हणाले, रामदास कदमांसह शिवसेना सोडून गेलेले आमदार निवडणुकीला उभे राहतील तेव्हा कोणाची उंची किती आहे ते कळेल. तुम्ही निवडणूक घ्या. जे विधानसभा सदस्य पळून गेले आहेत त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला उभं राहावं. तेव्हा कोण किती उंचीचं आहे ते कळेल.
हे ही वाचा >> “अपात्रतेच्या कायद्यात बदल होत राहतात, त्यामुळे…”, दिल्ली भेटीनंतर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य
संजय राऊत म्हणाले, रामदास कदम हे आमचे एकेकाळचे सहकारी आहेत. ते ज्या भाषेत बोलत आहेत त्या भाषेत मी बोलणार नाही. त्यांचे आणि आमचे अनेक वर्षांचे संबंध आहेत. ते आमचे जुने सहकारी आहेत. सहकारी म्हणून, मित्र म्हणून आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांनी त्यांचा एक वेगळा मार्ग स्वीकारला आहे. ते चुकीच्या मार्गाने गेले आहेत. त्यांची कारणं त्यांच्यापाशी, पण शिवसैनिक आणि जनता ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पाठीशी आहे. येत्या निवडणुकीत कोकणात हे चित्र दिसेल.