राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेबद्दल, त्यांच्या अजित पवारांबद्दलच्या भूमिकेबद्दल जनतेत संभ्रमाचं वातावरण आहे. शरद पवारांनी अजित पवार त्यांच्या पक्षाचे नेते असल्याचं मान्य केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. शरद पवार यांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. “अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यात कोणताही वाद नाही. राष्ट्रीय पातळीवर पक्षातला एक मोठा गट वेगळा झाला तर त्याला पक्षात फूट म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. परंतु, लोकशाही प्रक्रियेत तो त्यांचा अधिकार आहे”, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.
त्यापाठोपाठ साताऱ्याच्या दहिवडीमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवारांना पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी आधी केलेलं वक्तव्य फेटाळलं आणि अजित पवारांना पुन्हा संधी देणार नसल्याचं स्पष्ट केलं. पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा असं होणार नाही हे ठरलं होतं. त्यामुळे वारंवार संधी मागायची नसते आणि द्यायचीही नसते, असंही ते म्हणाले. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यांमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल संभ्रम असल्याचं बोललं जात आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. ते इंडिया आघाडीचे प्रमुख घटक आहेत. सध्या राज्यात वैचारिक लढा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट आहे की नाही हे जनतेला माहिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. जशी शिवसेनेत फूट पडली होती, तशीच राष्ट्रवादीत फूट पडली आहे. हा पक्षद्रोह आहे. आमच्या पक्षात फूट पडली तेव्हा आम्ही त्यांची हकालपट्टी केली. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस मधून एक गट फूटला आणि त्याने पक्षाच्या विचारधारेविरोधात भाजपाशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर त्या पक्षाने अजित पवार यांच्यासह फूटलेल्या लोकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याला फूट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? ही फूट आहे.
संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे दोन अध्यक्ष आहेत. एक म्हणजे जयंत पाटील आणि दुसरे सुनील तटकरे. ही फूट नाही का? अजित पवार गटाने शरद पवारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. याला आम्ही फूट मानतो. याबद्दल लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही. लोकांनी ठरवलंय फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपाबरोबर ईडीच्या भितीने हातमिळवणी केली आहे. स्वतः शरद पवार आणि त्यांचे सगळे प्रमुख सहकारी, समर्थक, शरद पवारांना मानणारा वर्ग आमच्याबरोबर आहे. एा वैचारिक लढ्याचं नेतृत्व करत आलेला, फुले, शाहू, अंबेडकरांचा विचार घेऊन पुढे आलेला वर्ग शरद पवारांबरोबर आहे आणि हा वर्ग महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे आम्ही ठरवलंय की येत्या निवडणुकीत महाराष्ट्रात आणि देशात भाजपाचा पराभव करायचा आहे.
हे ही वाचा >> “दोन दगडांवर पाय…”, शरद पवारांच्या भूमिकेबद्दल संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
संजय राऊत म्हणाले, अजित पवार कुठे आहेत किंवा त्यांचा गट कुठे आहे याच्याशी आमचा म्हणजेच महाविकास आघाडीचा काहीच संबंध नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीत सरळ सरळ दोन गट आहेत हे दिसतंय, आणि नसतील तर मग सुनील तटकरे कोणत्या पक्षाचे अध्यक्ष आहेत? ज्या पक्षाने तटकरेंची हकालपट्टी केली आहे त्या गटाशी आमचा संबंध आहे. या गटाचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलतो. आम्ही जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत आहोत. आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा करतो. आम्ही तटकरे किंवा अजित पवारांशी कोणतीही चर्चा करत नाही. महाविकास आघाडीच्या कोणत्याही विषयासंदर्भात त्यांच्याशी बोलत नाही.