राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक उद्योग गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी सरकारविरोधाता आवाज उचलला होता. महाराष्ट्रातून गेलेली गुंतवणूक हा चर्चेचा विषय बनला. त्यानंतर आता १६ जानेवारी पासून दावोस येथे आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद होत आहे. या परिषदेला देशातील सर्वच राज्यांचे प्रमुख गुंतवणूक आणण्यासाठी जात आहेत. १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दावोसचा दौरा अर्ध्यात सोडून येणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरुन शिंदे – फडणवीस हे राज्यात गुंतवणूक आणण्याबाबत गंभीर नाहीत, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे ही वाचा >> म्हणून शिवसैनिकांनी मुंबईत लावले तेजस ठाकरेंचे बॅनर; आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल शिवसैनिक म्हणाले…

..तर पंतप्रधानांनी दुसरी तारीख दिली असती

गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर नाहीत. देशातील सर्वच राज्याचे मुख्यमंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी जात आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री देखील तिथे जाणार आहेत. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना गुंतवणुकीपेक्षा मुंबईच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांचा दौरा आवश्यक वाटतो. पंतप्रधान राज्यात येतायत त्यांचे स्वागत केलेच पाहीजे. आपले पंतप्रधान चांगले आहेत. त्यांना जर विनंती केली असती तर प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यासाठी वेगळी तारीख दिली असती. प्रधानमंत्र्यांची वेगळी तारीख मिळू शकते, पण दावोसची दुसरी तारीख मिळणार नाही. महाराष्ट्राच्या प्रमुखांना गुंतवणुकीत रस दिसत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.

शिवसेनाला त्रास देण्यासाठी पंतप्रधानांचा दौरा आखला

“शिंदे असतील किंवा फडणवीस त्यांचे एकच धोरण दिसते, ते म्हणजे सर्वात आधी राजकारण आणि मग राज्य. गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र खाली जातोय. त्याची काळजी केली पाहीजे. प्रधानमंत्री तर येत-जात राहतील. पण पंतप्रधानांचा दौरा घेऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवली जात आहे. मुंबईत होणारी कामे आम्हीच करत आहोत. शिवसेनेला त्रास देण्यासाठीच आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांचा दौरा आवश्यक वाटतो”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

२० जानेवारीला भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

गांधी परिवाराने या देशासाठी बलिदान दिले. त्या परिवारातून आलेला एक तरुण देशाच्या एकतेसाठी, देशातील द्वेष-सूडभावना नष्ट करण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चार हजार किमी चालत निघाला आहे आणि जनता त्यांना पाठिंबा देत आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होणे हे प्रत्येक भारतीयचे कर्तव्य आहे. ही यात्रा महाराष्ट्रात आली असताना आदित्य ठाकरे नांदेड येथे यात्रेत सहभागी झाले. यात्रेचा शेवटचा टप्पा जम्मू आणि काश्मीरमध्ये होणार आहे. ३० जानेवारी रोजी ही यात्रा काश्मीरमध्ये पोहोचेल. त्यावेळी मी यात्रेत सहभागी होईल, हे राहुल गांधींना सांगितले होते. जम्मू आणि काश्मीर हा भूभाग देशासाठी अतिशय संवेदनशील राहिला आहे. स्व. बाळासाहेबांचेही या प्रदेशाशी भावनिक नाते होते. शिवसेनेतर्फे यावेळी मी भारत जोडो यात्रेत सहभागी होईल. २० जानेवरी रोजी जम्मू येथे मी यात्रेत सहभागी होईल, असे राऊत यांनी सांगितले.

हे वाचा >> मोठी बातमी! एकनाथ शिंदे-प्रकाश आंबेडकर यांच्यात अडीच तास खलबतं; राजकीय चर्चांना उधाण

मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांची छुपी बैठक झाल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता राऊत म्हणाले की, यात छुपं काय आहे? माझी देखील चार दिवसांपुर्वी बैठक झाली. ती काय छुपी होती का? जर संपुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मुख्यमंत्री आणि आंबेडकरांची बैठक झाली तर ती छुपी कशी? असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams shinde fadnavis government over pm narendra modi tour maharashtra kvg