शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, येत्या ११ जुलै रोजी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यावर येणाऱ्या निकालांनंतर ही राजकीय समीकरणं अजूनच बदलण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज टीव्ही ९ शी बोलताना बंडखोर आमदारांच्या आमदारकीवरून खोचक टोला लगावला आहे. तसंच, त्यांना जाहीर आव्हान देखील दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शिवसेनेशिवाय त्यांचं अस्तित्व नाही”

शिवसेना पक्षाशिवाय बंडखोर आमदारांचं अस्तित्वच नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. “ते शिवसेनेत नाहीत. विधिमंडळात त्यांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केलाय. पण शिवसेनेशिवाय त्यांचं अस्तित्व नाही. ते भाजपात मनानं, तनानं विलीन झाले आहेत. धनानं तर कधीच विलीन झाले आहेत”, असं राऊत म्हणाले.

“ते आमचे एकेकाळचे सहकारी होते. त्यांनी असे खेळ करू नयेत. तुम्हाला शिवसेनेत राहायचं नाही हे तुम्ही स्पष्ट केलंय. मग तुम्ही लोकांना भरकटवू नका”, असा सल्ला देखील राऊतांनी दिला आहे.

Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शाह यांची भेट, राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?

“आधी राजीनामा द्या, मग बोला”

“तुम्ही शिवसेना सोडली आहे. पण तांत्रिकदृष्ट्या तुम्ही तसं बोललात, तर लगेच तुमची आमदारकी रद्द होईल. कोर्टात जायचीही गरज नाही. किंवा त्यांनी शिवसेनेनं दिलेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग त्यांनी काहीही बोलावं”, असं थेट आव्हान राऊतांनी यावेळी दिलं आहे. “४० आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर त्यांनी निवडणूक लढवावी. मग आम्ही त्यांची दखल घेऊ”, असं राऊत म्हणाले.

“उद्धव ठाकरे खोटं बोलतायत असं म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. अनेकदा शिवसेनेत अशी फूट झाली आहे. त्यानंतर आधीपेक्षा जोमानं आणि दुप्पट ताकदीनं शिवसेना उसळून उभी राहिली आहे. यावेळीही तसंच होणार”, असा विश्वास यावेळी संजय राऊतांनी बोलून दाखवला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams shivsena rebel mla eknath shinde challeng to resign pmw
Show comments