“हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका”, असं आवाहन संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यामुळे नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात कलम ५०५ अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून संजय राऊतांनी आता महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी आज ट्वीट करून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
हेही वाचा >> “विजय मिळाला असता तर श्रेय मोदींनी घेतले असते, पण पराभवाचे मडके…’ कर्नाटक निकालावरून ठाकरे गटाची भाजपावर टीका
“नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन”बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.
हेही वाचा >> शिंदे सरकारबद्दलचं ‘ते’ वक्तव्य संजय राऊतांना भोवलं, गुन्हा दाखल; नेमकं काय म्हणाले होते?
“बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत . भविष्यात खटले दाखल होतील, असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला..मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे.या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल”, असा निर्धारही त्यांनी या ट्वीटमधून केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा ते नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी संजय राऊत म्हणाले की, “हे सरकार बेकायदेशीर आहे, लवकरच हे सरकार जाणार आहे, त्यामुळे सरकारी अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील त्यांनी या बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नये.”
हे ही वाचा >> “पहाटेचा शपथविधी योग्यच होता, कारण…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
या पत्रकार परिषदेत राऊत यांनी जे आरोप केले होते त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करत आहेत.