भाजपा आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित निःपक्ष चौकशीची मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण देवेंद्र फडणवीसांसाठी अग्नीपरीक्षा असल्याचं सूचक विधानही त्यांनी केलं. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घावावं अशी आमची मागणी आहे. ते या राज्याचे उपमुख्यमंत्रीही आहेत. ते स्वत:ला पक्षपाती मानत नाहीत. नऊ पक्षाच्या नेत्यांनी जेव्हा पंतप्रधानांना पत्र लिहिलं तेव्हा ते म्हणाले, की तुम्ही भ्रष्टाचार करू नका, तपास यंत्रणा तुमच्यावर कारवाई करणार नाही. त्यामुळे आता राहुल कुल यांचं प्रकरण देवेंद्र फडणवीसांसाठी एक अग्नीपरीक्षा आहे, अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
ही भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची पद्धत आहे का?
पुढे बोलताना त्यांनी किरीट सोमय्यांच्या मुद्द्यावरूनही फडणवीसांना लक्ष्य केलं. किरीट सोमय्यांनी आएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा घोटाळा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते भूमिगत झाले. कोर्टाने त्यांना जामीन नाकारला. पण देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी थांबवली. ही तुमची भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची पद्धत आहे का? आएनएस विक्रांत घोटाळ्यात किरीट सोमय्यासारख्या लफंग्यांना तुम्ही क्लीनचिट कशी देता? असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना दिले आव्हान
देवेंद्र फडणवीस जर खरे असतील तर त्यांनी भीमा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी चौकशी करावी. हे प्रकरणं ईडीकडे सोपवण्याची मागणी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आव्हानही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले.