केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनीही या निर्णयानंतर शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. राऊत सध्या कोकणाच्या दौऱ्यावर असून ते आज कणकवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा – “रावणाने हातात धनुष्यबाण घेतला म्हणून…” संजय राऊत यांची शिंदे गटावर घणाघाती टीका
काय म्हणाले संजय राऊत?
“या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली आहे की, राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्षाची व्याख्या काय? एक पक्ष ५० वर्षांपासून उभा आहे. तो पक्ष घटनेनुसारच चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार-खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले. अशावेळी तो पक्ष त्यांचा कसा होऊ शकेल? हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ लोकशाहीत आज आली आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा – “बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर…” प्रमोद महाजन यांनी शिवसेनेविषयी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली
मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
पुढे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता एका म्हणीचा आधार घेत बोचरी टीका केली. “समाज माध्यमांवर लोकांनी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात एका म्हणीचा उल्लेख आहे की, पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही,” असे ते म्हणाले.
हेही वाचा – “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवसेनाभवन शिंदे गटाच्या ताब्यात? राऊत म्हणाले…
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा शिंदे गटाच्या ताब्यात जाणार का? असं विचारलं असता, “निवडणूक आयोगाने शेण खाल्लं म्हणून आमच्या शाखा त्यांच्या ताब्यात जाणार नाहीत. आमचे शिवसैनिक तिथेच बसतील आणि ती जागा शिवसेनेची शाखा म्हणूनच काम करेल. शिवसेना पक्ष आमचाच आहे. खुर्चीवर बसलेल्या काही लोकांनी निर्णय घेतला म्हणून पक्ष कुठेही जात नाही. शिवसेना भवनासह शिवसेनेची शाखा, शिवसेनेची संपत्ती आणि हजारो लाखो शिवसैनिक आमच्या बरोबरच राहतील”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.