Sanjay Raut २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची दोन ते तीनवेळा भेट घेतली. तसंच आदित्य ठाकरेंनीही भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे बरोबर येणार का? या चर्चाही रंगल्या. मात्र दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर नाही असं दिलं होतं. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे, पण घेतलं जात नाही असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी चिमटा काढल्यानंतर आता संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

“अमितभाईंचं (अमित शाह) पाचशे पानी स्वतः तयार केलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक छत्रपती शिवरायांवर आहे. त्यांनी संदर्भ गोळा केले आहेत पण ते पुस्तक त्यांचं आहे. येत्या काही दिवसांत ते पुण्यात प्रकाशित करायचं की दिल्लीत इतकाच मुद्दा राहिला आहे. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊत यांनाही चक्कर येईल. इतका अभ्यास अमित शाह यांनी केला आहे. अशा अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेत नाही तुम्हाला यायचं आहे पण घेत नाहीत. म्हणून किती दुस्वास करणार?” याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलंय.

संजय राऊत काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांनी अजिबात चिंता करु नये. आमच्याकडे उमेदवार आहेत. त्यांनी अमेरिकेतल्या तुलसी गॅबॉर्ड ज्या आहेत त्यांनी ईव्हीएमबाबत भाष्य केलं आहे. तुलसी गेबॉर्ड यांनी वॉशिंग्टनमध्ये सांगितलं की ईव्हीएम हॅक होऊ शकतं. त्या अमेरिकेच्या इंटलिजन्स च्या प्रमुख आहेत. महाराष्ट्रात कसा विजय मिळवला आहे हे मोदींच्या मैत्रिणीने सांगितलं आहे. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. तसंच सत्तेसाठी आम्हाला अमित शाह यांचे पाय चाटायची गरज नाही असंही संजय राऊत म्हणाले.

आम्ही इतके लाचार आणि नीच नाही-संजय राऊत

आम्हाला अमित शाह यांचे पाय चाटायची गरज नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे. संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत. उद्धव ठाकरेंनाही त्यांच्या बरोबर सत्तेत जायचं नाही. आम्ही इतके लाचार आणि नीच नाही. चंद्रकांत पाटील यांनी स्वतःची आणि पक्षाची चिंता करावी. लांड्या लबाड्या करुन आपण सत्तेवर आला आहात. ती सत्ता तुम्हाला लखलाभ होवो. भ्रष्ट आणि चोर मंडळी तुमच्याबरोबर आहेत तुम्ही त्यांना सांभाळत बसा असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.