लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांना आमदार, खासदार, मंत्री पद ही मक्तेदारी फक्त आमचीच आहे असे वाटते. त्यांच्या हातातून संस्था बँका बुडाल्या मात्र सामान्य शेतकरी घरातल्या पोराने राजकारणात येऊन संसद हे स्वप्न बघत असताना त्याचे रस्ते बंद करायचे व जनतेने आमचे गुलाम राहायचे यासाठीच देशात लोकशाही आली नाही अशी खरमरीत टीका उबाठा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी केली.

शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी तासगाव, विटा, कडेगाव आदी ठिकाणी आज पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख संजय विभुते, संघटक बजरंग पाटील, दिगंबर जाधव आणि उमेदवार पाटील उपस्थित होते.

आणखी वाचा-श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर; ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर म्हणाल्या, “एकवेळ चौक कमी पडतील…”

यावेळी बोलताना खा. राउत म्हणाले, सांगलीत काँग्रेस का लढत नाही हा प्रश्‍न केवळ एक, दोन लोकांनाच पडला आहे. पन्नास वर्षे घराणे सत्ता व मक्तेदार्‍या याला आव्हान शिवसेना व ठाकरेंनी देत सामान्य फाटक्या माणसांना मोठेपदावर नेऊन बसवले. शिवसेनेची कोंडी करण्याचा कोणी प्रयत्न केला तर ती कोंडी फोडण्याची आमची तयारी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने नौटंकी बंद करून महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सहभागी व्हावे.

भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी अनेक पक्ष बदलले, आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत जे जनतेशी काय एकनिष्ठ राहणार? अब की बार ४०० पारचा नारा देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०० जागाही मिळणार नाहीत. त्यांनी देशाला फसवले असून भाजपमधील भ्रमिष्ट लोकांची टोळीच मोदींचे अंधभक्ती करत आहेत. करोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी जनतेची काळजी घेतली, मात्र मोदींनी लोकांना टाळ्या वाजवा, लाईट घालवा, असल्या भंपक गोष्टी सांगितल्या व देशाला २०० वर्ष मागे नेण्याचे काम केले अशी टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut talk about monopoly of mp and mla in western maharashtra in sangli mrj
Show comments