शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवता आणि संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली आहे. या विधानाचा निषेध नोंदविण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून आज ( १७ डिसेंबर ) ठाणे बंदची हाक दिली आहे. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, अखिल हिंदू समाज आणि हिंदूत्वादी संघटनांनी पाठींबा देऊ केला आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाणे शहर बंद आहे. कशासाठी मुख्यमंत्री आपलं शहर बंद करत आहेत. त्यांच्याबाजूला बसलेले गृहमंत्री हे सर्व पाहत आहेत. यांच्याकडे काही काम नसून, डोक्यातील गांडूळाचा मेंदू नुसता वळवळत असतो. तुम्ही राज्यकर्ते असून, विचारांचा प्रतिवाद विचाराने करा आणि उत्तर द्या. कोणतातरी वारकऱ्यांचा एक गट पकडून आमच्यावर सोडून द्यायचे. हे किती काळ चालणार,” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दबलं गेलं”, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकारवर घणाघात होणार या भीतीने…”

“जरी तुमचं राज्य घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलं तरी तुम्ही सत्तेवर आहात. सत्तेवर असल्याचं भान ठेवा. प्रगल्भता दाखवा, आपण प्रौढ झालो आहोत. खरेतर शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाल्यावर महाराष्ट्र बंद करायला हवा होता. पण, आम्ही तो बंद पुढे ढकलला आहे. सध्या आम्ही मोर्चात सहभागी झाले आहोत. मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, ठाणे बंद मागे घ्यावा. कारण, पाचपाखाडी आणि वागळे इस्टेट बंद करण्याएवढीच मुख्यमंत्र्यांची ताकद आहे,” असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

Story img Loader