Sanjay Raut on Harshvardhan Patil To Join NCP Sharad Pawar : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रामराम करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. भाजपा प्रवेशानंतर ते प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले होते की “आता मला शांत झोप लागते”. मात्र पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत परत जाणार आहेत. पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पाटील यांना शांत झोप लागण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता पाटील यांनी ‘नो कॉमेंट्स’ असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळलं. तर दुसरीकडे, “हर्षवर्धन पाटील यांना भाजपात शांत झोप लागली नसावी, मात्र आता ते महाविकास आघाडीत येत आहेत. त्यामुळे इथून पुढे त्यांना शांत झोप लागेल. याची खात्री देतो”, असं वक्तव्य शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांना म्हणाले, शांत झोप लागावी म्हणून तुम्ही भाजपात गेला होतात मग आता परत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (शरद पवार) का जात आहात? यावर पाटील म्हणाले, ‘नो कॉमेंट्स’
हे ही वाचा >> Raj Thackeray: “संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…”, मंत्रालयात आमदारांनी जाळीवर उड्या मारल्यानंतर राज ठाकरेंची संतप्त पोस्ट
संजय राऊत काय म्हणाले?
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश हा शरद पवारांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. त्यावर मी न बोललेलं बरं. हर्षवर्धन पाटील हे भाजपात गेले तेव्हा आम्हा सर्वांना धक्का बसला होता. शांत झोप लागावी म्हणून ते तिकडे गेले होते. मात्र, तिकडे त्यांची शांत झोप लागली नसावी. परंतु, आता ते ज्या ठिकाणी येत आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीत येत आहेत, इथे त्यांना शांत झोप लागेल. आम्ही त्यांना खात्री देतो की महाविकास आघाडीत आल्यावर त्यांना व त्यांच्यासारख्या इतर नेत्यांना शांत झोप लागेल, सुखाने झोप मिळेल. ते या पुढे चिंतामुक्त जीवन जगतील. महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी ते परत आले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो.
हर्षवर्धन पाटील यांच्याआधी अंकिता पाटील यांचा भाजपाला राम राम
हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या आधी भाजपाला राम राम केला. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षात जात असल्याचं जाहीर केलं. त्याआधी त्यांनी इंदापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला.