ठाकरे गटाच्या विधानपरिषद सदस्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्या पार्श्वभूमवीर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या वातावरणातच आज शिवसेनेचा वर्धापन दिन दोन्ही गटांकडून साजरा केला जात आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं असून पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून आपणच खरी शिवसेना असल्याची भूमिका आक्रमकपणे मांडली जात आहे. यातच आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने ठाकरे गटानं शिंदे गट व खुद्द एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
“शिवसेना ५७ वर्षांची झाली हा चमत्कारच”
“शिवसेना ५७ वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल. स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे; पण कोणी कितीही बेइमानी केली तरी ‘सामना’ शिवसेनाच जिंकत आली व सर्व महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले. वर्षभरापूर्वी याच काळी शिवसेनेतील ४० बेइमानांनी आईच्या दुधाशी गद्दारी केली. ते भाजपास सामील झाले व ‘आम्हीच खरी शिवसेना’ असे मिरवू लागले. अर्थात शिवसेनेच्या स्थापनेपासून असे प्रतिशिवसेना स्थापणारे आले आणि काळाच्या ओघात नष्ट झाले”, असा टोला अग्रलेखात लगावण्यात आला आहे.
“यांच्या कमरेवरची वस्त्रे दिल्ली दरबारी…”
“शिवसेनेच्या जडणघडणीत, पर्यायाने महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचे योगदान काय? शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता. आता म्हणे ‘आम्हीच शिवसेनेचे निर्माते!’ हा असा आव आणणाऱ्यांच्या कमरेवरची वस्त्रं दिल्ली दरबारी उभे राहताच भीतीने भिजतात. यांचे नेते मोदी आणि शहा, जे महाराष्ट्राच्या अस्मितेचा पायाच उखडून टाकायला निघाले आहेत. तर हे प्रतिवालेही त्यांच्या प्रतिशिवसेनेचा म्हणे वर्धापन दिन साजरा करीत आहेत. अशा ‘प्रति’ मंडळांच्या मनगटात ना ताकद ना छातीत स्वाभिमानाचा हुंकार आणि जिद्द. सर्व खेळ पैशांचा”, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
कुवत, मर्यादा ओळखून बोला! एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले
“शिवसेनेसाठी रक्त सांडणारे असंख्य आत्मे…”
“दिल्लीच्या चरणी थैल्या वाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणारे शिवसेनेचे नाव घेतात तेव्हा शिवसेनेसाठी रक्त सांडणारे असंख्य आत्मे चिडून तडफडत असतील. महाराष्ट्रात नकली वाघांचा एक ‘मिंधे प्रयोग’ जनतेच्या माथी मारण्यात आला आहे. जनतेने या प्रयोगाकडे पाठ फिरवली असली तरी ही ४० पात्रे स्वतःच स्वतःला नाचवून घेत आहेत. शेवटी ईडी सरकारच्या खाल्लेल्या मिठाला जागायला हवे. ईडी सरकार आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘उधारी’च्या मालावर या ‘मिंधे’ गटाची राजकीय दुकानदारी सुरू आहे”, असा टोला ठाकरे गटानं लगावला आहे.
“सकाळी निष्ठेच्या आणाभाका घ्यायच्या आणि…”
“महाराष्ट्रात सध्या डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे. असे अनेक कोल्हे-लांडगे मागील ५७ वर्षांत महाराष्ट्राच्या वाघाने शिकार करून फस्त केले आहेत. महाराष्ट्रातील मिंध्या कोह्या-लांडग्यांचे केकाटणे वाघाच्या डरकाळीत विरून जाणार आहे. शिवसेना ही मर्द मावळय़ांची भगवद्गीता आहे. खरी शिवसेना तीच, जिच्या पोटात एक ओठात दुसरे नाही. ओठात एक व पोटात भलतेच हा दांभिक कावा शिवसेनेस ठाऊक नाही. इथे सकाळी निष्ठेच्या आणाभाका घ्यायच्या व रात्रीच्या अंधारात सुरतचा ढोकळा खायला पळून जायचे हे दळभद्री उद्योग शिवसेनेच्या रक्तात नाहीत”, अशा शब्दांत ठाकरे गटानं शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.