औरंगाबादमधील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा ३८ वा वर्धापन दिन आज साजरा केला जात आहे. ३८ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने मराठवाड्यात प्रवेश केला होता. यानिमित्त आयोजित मेळाव्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना पक्ष नव्हे तर धगधगता विचार आहे. शिवसेनेला मराठवाड्यात येऊन आज ३८ वर्ष झली तर पक्षाच्या स्थापनेला राज्यात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. तरीदेखील शिवसेना टिकून राहिली आहे.
शिवसेनेचा एक धगधगता इतिहास आहे. परंतु इतिहासाबरोबर भूगोलाचा विचारही करायला हवा. आपल्या ताब्यात किती भूगोल आहे हे राजकारणात महत्त्वाचं आहे. मी मंचावर बसल्यावर समोर पाहिलं. या समोरच्या गॅलरीवर माझं लक्ष होतं. हा मराठवाडा इतका मोठा आहे, मराठवाड्यात इतके जिल्हे आहेत. येथील कार्यक्रमाला खूप गर्दी जमते. यापूर्वी ८ जूनला आम्ही इथे आलेलो आहोत. परंतु कधीच समोरची गॅलरी रिकामी दिसली नव्हती. पण आज ती रिकामी आहे. आपल्या सर्व प्रमुख नेत्यांनी यावर आत्मचिंतन केलं पाहिजे.
हे ही वाचा >> मुंबई उच्च न्यायालयाचा समीर वानखेडेंना दिलासा; २३ जूनपर्यंत…
खासदार संजय राऊत म्हणाले, मला असं वाटतं, या सभागृहात फक्त पदाधिकारी आले आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याने येताना १०-१० शिवसैनिक आणलेले नाहीत. शिवसैनिक का आले नाहीत याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. शिवसैनिक का आले नाहीत याचं आत्मपरिक्षण करावं. आपल्याकडे सध्या पक्षाचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नाही, तरिही आपण लढत आहोत संघर्ष करत आहोत, हे लक्षात ठेवावं.