राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरची आव्हानं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. एकीकडे ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील नगरसेवक मोठ्या संख्येनं शिंदे गटात सामील झालेले असताना दुसरीकडे पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंसोबत राहणार की जाणार? याविषयी आता संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. उद्धव ठाकरेंसोबत असणारे काही शिवसेना नेते भाजपासोबत चर्चा करण्याचा देखील सल्ला देत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्वीट केलं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ट्वीटचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे ट्वीटमध्ये?

संजय राऊतांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये शिवसेना अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असून लढा देण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच मिळत आहेत. “जब ‘खोने’ के लिए कुछ भी ना बचा हो तो ‘पाने’ के लिए बहुत कुछ होता है! जय महाराष्ट्र!” असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे. शिवसेनेतून आधी एकनाथ शिंदेंसोबत बंडखोर आमदार, त्यानंतर ठाणे-नवी मुंबई-कल्याणमधले नगरसेवक शिंदे गटासोबत गेल्यानंतर आता काही शिवसेना खासदारांनी भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंना विनंती केल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसमोरील पेचप्रसंग वाढत आहेत.

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह जाणार? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले “तयारी ठेवा, नवं चिन्ह…”

शिवसेनेचं चिन्ह जाणार?

आत्तापर्यंत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं ठामपणे सांगितलं जात होतं. मात्र, आता ते चिन्ह देखील जाणार असल्याचं बोललं जात आहे. खुद्द उद्धव ठाकरेंनीच त्याचे सूतोवाच दिले आहेत. एबीपीनं दिलेल्या वृत्तानुसार उद्धव ठाकरेंनी पक्ष कार्यकर्त्यांना “नव्या चिन्हाची तयारी ठेवा”, असं आवाहन केलं आहे. त्यामुळे आमदार, नगरसेवकांच्या पाठोपाठ शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह देखील जाणार असल्याचं बोललं जात आहे,.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut tweet about shivsena politics future party sign pmw