अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, त्यानंतर देखील नाट्यमय घडामोडी संपण्याचं नाव घेत नाहीयेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निकाल प्रलंबित असताना दुसरीकडे त्यामुळे राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार देखील लांबणीवर पडू लागला आहे. शिवाय सरकार स्थापनेवरच आक्षेप घेत शिवसेनेनं याचिका दाखल केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत राजकीय परिस्थिती अधांतरीच राहण्याची चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी सूचक शब्दांत ट्वीट केलं आहे. शिवाय, या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, प्रियांका गांधी उद्धव ठाकरे या सगळ्यांनाच टॅग केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश!

११ जुलै ही तारीख राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. कारण याच दिवशी नव्या सरकारविरोधात आणि बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होणार होती. मात्र, या सुनावणीवेळी न्यायालयानं फक्त विधानसभा अध्यक्षांना बंडखोर आमदारांविरोधात याचिकांवर सुनावणी होऊन निकाल येईपर्यंत तूर्त कारवाई करू नये, असे निर्देश दिले. तसेच, या प्रकरणाची सुनावणी स्वतंत्र खंडपीठासमोर होणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, उशीरा दिलेला निकाल म्हणजे प्रत्यक्ष न्याय देण्यासच विलंब होत असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी केलेल्या ट्वीटमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

काय आहे ट्वीटमध्ये?

संजय राऊतांनी या ट्वीटमध्ये स्वत:चा फोटो शेअर कर त्यासोबत भारतातून पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झालेले सुप्रसिद्ध उर्दू कवी सय्यद हुसेन उर्फ जॉन एलिया यांच्या काही ओळी ट्वीट केल्या आहेत. “अब नहीं कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा है..”, अशा ओळी संजय राऊतांनी ट्वीट केल्या आहेत.

शिवसेना म्हणते, “शिंदे-फडणवीसांचे सरकार बेकायदेशीरपणे महाराष्ट्राच्या जनतेवर लादले गेले, न्यायाला जेवढा उशीर होईल तेवढे…”

“सगळ्यांच्याच हातात खंजीर आहे”

या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी सर्वात आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विटर हँडल, उद्धव ठाकरेंचं कार्यालय आणि प्रियंका गांधी या क्रमाने नेत्यांना टॅग केलं आहे. नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “हे भविष्यात कळेलच की कुणाला कुणापासून धोका आहे. आम्हाला कुणापासूनही धोका नाही. जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं. पण भविष्यात कुणीही राजकारणात स्वत:ला सुरक्षित समजू नये. सगळ्यांच्याच हातात खंजीर आहेत. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकापासून धोका आहे”, असं राऊत म्हणाले.