अजित पवारांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर उत्तरादाखल केलेल्या भाषणात संभाजी महाराजांविषयी केलेल्या उल्लेखावरून राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू आहे. त्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातही कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते व आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर टोलेबाजी केली असताना राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता राऊतांनी ट्वीटच्या माध्यमातून सूचक केल्यामुळे नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले होते दीपक केसरकर?
शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना लक्ष्य करताना त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात जाण्यासाठी तयार राहण्याचा इशारा दिला होता. “संजय राऊतांनी पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी तयार राहावं”, अशा आशयाचं विधान दीपक केसरकरांनी केलं होतं. केसरकरांच्या या विधानावर प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनीही खोचक शब्दांत टोलेबाजी केली.
“केसरकरांनीही तयारी ठेवावी, सगळं तयार आहे”
“आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही जाऊ पुन्हा जेलमध्ये. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे, लफंगे नाही आहोत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. कायदा नाही. दीपक केसरकर खरंच असं बोलले असतील, तर २०२४ साली त्यांनीही तुरुंगात जायची तयारी ठेवावी, सगळं तयार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
“मला आशा आहे की अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस…”
संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना टीका केल्यानंतर एक सूचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी केसरकरांच्या विधानाचा उल्लेख करतानाच शिंदे गटाचा उल्लेख ‘शिंदे गँग’ असा केला आहे. “शिंदे गँगच्या दीपक केसरकरांनी मला पुन्हा एकदा अटक करण्याची धमकी दिली आहे. मला आशा आहे की अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस खुलेआम दिल्या जाणाऱ्या या धमक्या पाहात असतील”, असं संजय राऊतांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“दीपक केसरकरांना असं वाटतंय का की कायदा तुमच्या इशाऱ्यांनुसार तुमच्या कोठीवर नाचत आहे? केसरकर महोदय, मला अटक करा, फासावर द्या किंवा गोळी घाला..मी पुन्हा सांगतो, झुकेगा नहीं साला”, असंही संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. “हुकुमशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. खून करा, नाहीतर तुरुंगात टाका”, असंही ट्वीटमध्ये राऊतांनी म्हटलं आहे.
या ट्वीटमुळे आता संजय राऊत विरुद्ध दीपक केसरकर असा वेगळाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.