महाविकास आघाडीने अलीकडेच मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह शिंदे गट व भाजपाच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलल्या आक्षेपार्ह विधानांच्या निधेषार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला लाखोंच्या संख्येत लोकांनी पाठिंबा दिल्याचा दावा, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शनिवारी या मोर्चाचा उल्लेख ‘नॅनो’ मोर्चा असा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये भगवे झेंडे हातात घेतलेल्या लोकांची गर्दी दिसत आहे. ही गर्दी महामोर्चात आलेल्या लोकांनी केल्याचा दावा राऊतांनी केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “देवेंद्र फडणवीस ज्यास ‘नॅनो’ मोर्चा म्हणून हिणवलं, तो हाच मोर्चा आहे. देवेंद्रजी, असं वागणं बरं नाही,” असा टोलाही राऊतांनी लगावला.

हेही वाचा- “मुख्यमंत्र्यांनाही लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत आणणार”, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांची मोठी घोषणा

या व्हिडीओवर आता देवेंद्र फडणवीसांनी सवाल उपस्थित केले आहेत. संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. या व्हिडीओची मी पडताळणी करणार आहे, असंही फडणवीस म्हणाले. ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “नाकाखालून सरकार घेतलं की आणखी…”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरून अजित पवारांची टोलेबाजी!

राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फडणवीस म्हणाले, “संजय राऊतांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. मी काल महाविकास आघाडीच्या मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ म्हटलं होतं, कारण तो मोर्चा ‘नॅनो’च होता. सात संघटना एकत्र करूनही त्यांना २०-२२ हजार लोक जमा करता आले नाही, असा तो मोर्चा होता. पण संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. याची मी नक्की पडताळणी करेन. हा व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो. कारण ‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut tweet video maratha kranti morcha as mahamorcha devendra fadnavis asked question rmm