भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी करोना काळातील खिचडी वाटप घोटाळ्यावरून शिवसेना उबाठा गटावर टीका केली होती. या टीकेला शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे प्रत्युत्तर दिले. “दोन-पाच लाख रुपयांच्या चौकशीसाठी ईडीकडून आमचे नेते वेठीस धरले जात आहेत. एवढी ईडीची पातळी घसरली का?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून अनेक नेते भाजपात गेल्यानंतर ईडी गप्प बसते. किरीट सोमय्या गप्प बसतात. विक्रांत (जहाज) बचाव प्रकरणात किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपये गोळा केले. आम्ही मविआ सरकारच्या काळात तक्रार केल्यानंतर सोमय्या बाप-लेक परागंदा झाले होते. भाजपाचे सरकार आल्यानंतर त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला गेला. सोमय्या यांच्यात हिंमत होती तर त्यांनी त्याचवेळी चौकशीला सामोरे जायला हवे होते, असे प्रतिआव्हान संजय राऊत यांनी दिले. सोमय्या यांच्यावर आरोप करत असताना राऊत यांनी काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला.
संजय राऊत म्हणाले की, “किरीट सोमय्या यांची आमच्यावर आरोप करण्याची लायकी नाही. सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठान संस्थेने धमक्या देऊन कोट्यवधीच्या देणग्या गोळा केल्या. सोमय्यांनी मेट्रो डेअरी, मोतीलाल ओसवाल यांच्याविरोधात मोहीम उघडली होती, नंतर त्यांच्याकडून सोमय्यांच्या संस्थेला मोठ्या देणग्या मिळाल्या आहेत.”
किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओवर भाष्य
सोमय्या यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून संजय राऊत यांनी आमचाही बॉस वर बसला आहे, असे विधान केले. आमचा पक्ष फोडला आणि आता उरलेल्या नेत्यांवर चौकशीचा ससेमिरा लावला आहे. पण आम्ही घाबरणार नाही. किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पाच महिला समोर आलेल्या आहेत. आम्ही त्यांना जनता न्यायालयात उभे करू. या पाचही महिलांचे शोषण झाले आहे, त्याबद्दल त्याच सर्वकाही सांगतील. मध्यंतरी सोमय्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यापेक्षाही गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. आतापर्यंत सोमय्या यांच्या कुटुंबाकडे पाहून आम्ही या पातळीवर उतरणार नव्हतो. पण किरीट सोमय्यांच्या बिनबुडाच्या आरोपामुळे आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही, असे सुतोवाच संजय राऊत यांनी केले.
खिचडी घोटाळ्यातील आरोपी शिंदे गटात
गेल्या काही दिवसांपासून उबाठा गटाच्या नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी होत आहे. रवींद्र वायकर, सुरज चव्हाण, संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची चौकशी झाली आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज चौकशी होत आहे. सुरज चव्हाण यांच्यावर खिचडी वाटप घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. त्यावर बोलत असताना राऊत म्हणाले, “खिचडी घोटाळ्यातील सर्व लाभार्थी हे आज भाजपा आणि शिंदे गटात आहेत. घोटाळेबाज लोकांचे वर्षा बंगला आणि देवगिरी बंगल्यावर केटरींग सुरू आहे. सुरज चव्हाण यांचे व्यवसायातील भागीदार आज शिंदे गटात आहेत, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? सुरज चव्हाण प्रकरणात १२० लोकांनी खिचडी वाटप केले. पण एकट्या सुरज चव्हाण यांच्यावरच कारवाई केली गेली.”