खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळेच संजय राऊत हे रोज काही ना काही वक्तव्य करत असतात. संजय राऊत यांना मी एवढंच सुचवू इच्छितो की आपलं बोलणं जरा त्यांनी सुधारावं. होळीत आपल्या मनात येणारे वाईट विचार जाळून टाकावेत असाही सल्ला भरत गोगावले यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना हे वक्तव्य केलं आहे. आपल्या मराठीत म्हण आहे की ठेच लागली की बघून चालावं. पण यांना किती ठेचा लागल्यावर हे सुधारणार आहेत माहित नाही असंही भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा विडा उचलेला दिसतो आहे. संजय राऊत हे दिवसेंदिवस खूपच दर्जा सोडून बोलत आहेत असंही गोगावले यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. त्या दिवसापासूनच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तसंच आदित्य ठाकरे हे सातत्याने निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा चुकीचा आहे. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही हे उद्धव ठाकरे सातत्याने सांगत आहेत. तर दुसरीकडे आजही संजय राऊत यांनीही ठाकरेंशिवाय शिवसेना असूच कशी शकते असा प्रश्न उपस्थित केला आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना संजय राऊत हे सातत्याने अलीबाबा आणि चाळीस चोर असंही संबोधत आहेत. त्यांच्याविषयी आज भरत गोगावले यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा संजय राऊत यांनी तोंडावर ताबा ठेवला पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंची शिवसेना संजय राऊत यांनी संपवण्याचा विडा उचलल्याचं दिसतं आहे असा खोचक टोलाही लगावला आहे.