राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु असताना हनुमान चालिसावरुन शिवसैनिक आणि राणा दांपत्य आमने-सामने आले आहेत. राणा दांपत्याने ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यापासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दांपत्याने शनिवारी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नऊ वाजताच राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर असलेले बॅरिकेट्स तोडून शिवसैनिक इमारतीत घुसले आहेत. शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांकडून करण्यात आला. मात्र नवनीत राणा आणि रवि राणा मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
“या घटनेकडे एक शिवसैनिक म्हणून जसे पाहायला हवे तसेच मी पाहत आहे. कोणाच्यातरी पाठबळाने तुम्ही मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक शांत बसतील का? सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी काय करावे हे सल्ले तुमच्याकडून ऐकून अंमलबजावणी करण्याचा भिकारीपणा महाराष्ट्राला आलेला नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
“तुम्ही तुमची लक्ष्मणरेषा ओलांडली तर शिवसैनिकांना सुद्धा संतापून तुमच्या घरापर्यंत घुसण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय तपास यंत्रणा येतील या धमक्या आम्हाला देऊ नका. या क्षणी शिवसैनिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. अजून सुरुवात झालेली नाही. मुंबईत दोन दिवसांत घडलेल्या घटना या जनतेच्या भावनेचा स्फोट आहे. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हालाही घरे आहेत हे लक्षात ठेवा,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
“केंद्रीय पोलीस बलाचा वापर करुन आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर आम्हाला रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही. शिवसैनिक यासाठी सक्षम आहे. शिवसैनिक सदैव मरायला आणि मारायला तयार असतो. सरकार असल्यामुळे आमचे हात बांधलेले आहेत. केंद्र सरकार पुरस्कृत तुमच्या झुंडशाहीला शिवसैनिकांनी उत्तर दिले तर तुम्हाला मिरच्या का झोंबत आहे. तुम्ही आमच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक शांत बसणार नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.
“राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत. राष्ट्रपती राजवट, सीबीआय, ईडी याच्या पलिकडे आम्ही गेलेलो आहोत. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाहीत. सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे असे बाळासाहेबांनी म्हटले आहे. शिवसेना एक शक्ती आहे. त्याचा चटका तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. जे होत आहे ते एकदाच होईल. बायकांच्या आडून भाजपा शिखंडीचे उद्योग करते आहे. हे बंद करा,” असे राऊत म्हणाले.