१६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय घेण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांना तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांबाबत मोठा दावा केला आहे.
नितेश राणे म्हणाले की,”भाजपाच्या नेत्यांना धमक्या दिल्या तर आम्हीही गप्प बसणार नाही. धमकी देण्याचे दिवस गेलेत. जे काही योग्य वायतंय तेच अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. नियमांत, कायद्याच्या चौकटीत आहे तेच करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात तीन महिन्यांतच निर्णय घ्या असे आदेश आलेले नाहीत. कायद्याच्या अनुसारांतच निर्णय घेतले, तुला काय करायचंय ते कर”, असा ऐकेरी उल्लेख करत त्यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे.
हेही वाचा >> देशातल्या इतक्या राज्यांमध्ये आहे काँग्रेसची एकहाती सत्ता, जाणून घ्या एका क्लिकवर!
“मी बेट लावून सांगतो की पुढच्या तीन महिन्यांत हा जेलमध्ये जातो की नाही पाहा. तीन महिन्यांनंतर हा तुम्हाला बाहेर दिसणार नाही. पत्राचाळच्या केसमध्ये आरोप निश्चित झालेला आहे. आता हा ९० दिवसांचा मेहमान आहे. ९० दिवसांनी हा तुरुंगात दिसणार”, असा दावाही नितेश राणेंनी केला आहे.
“संजय राऊतांना सरकार पाडायचं होतं आणि स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं. २०१९ पासून उद्धव ठाकरेंच्या पदाला सुरूंग लावण्याचं काम करत होता. ज्या खुर्चीवर याचा डोळा होता त्या खुर्चीवर पवार साहेबांनी ठाकरेंना बसवलं. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या खुर्चीच्या खाली टाईमबॉम्ब लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं”, असंही नितेश राणे म्हणाले.
“नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी मित्रपक्षाला कळवलं होतं. मी राजीनामा देतोय, हे पक्षाध्यक्षांना कळवा असं नाना पटोले संजय राऊतांना बोलले होते. परंतु, संजय राऊतांनी कळवलं नाही”, असंही नितेश राणे पुढे म्हणाले.