शिवसेना पक्षात फूट पडल्यामुळे उघड-उघड दोन गट पडले आहेत. शिवसेनेतील या अस्थिरतेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये सविस्तर भाष्य केले आहे. असे असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार मुलाखत आणि सडेतोड उत्तरे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत येत्या २६ आणि २७ जुलै रोजी प्रदर्शित केली जाईल असे जाहीर केले आहे. या मुलाखतीत शिवेसेना पक्षफुटीबातची सर्व उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> तर शिंदे गटाला मनसेमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आल्यास विचार करु- राज ठाकरे
उद्धव ठाकरे शिवसेना बंड, पक्षाची आगामी वाटचाल यावर भाष्य करणार?
संजय राऊतांनी या मुलाखतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाकडून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत येत्या २६ आणि २७ जुलै अशा दोन दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या मुलाखतीमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरेंना शिवसेनेतील बंड तसेच शिवसेना पक्षाची आगामी वाटचाल यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. राऊतांनी हे प्रश्न विचारले तर उद्धव ठाकरे नेमकी काय उत्तरे देणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा >>> “तो निर्णय बाळासाहेब ठाकरेंचा, एकच गोष्ट विचारत होतो की…” शिवसेना नेतृत्वावर बोलताना राज ठाकरेंचे भाष्य
दरम्यान, शिवसेना पक्षातील बंडावर मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “चांगल्या काळामध्ये सत्तेवर यायचं, संपत्ती गोळा करायची. वाईट काळ आला की बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर लोकांना भावनिक करायचं, असे उद्योग सुरु आहेत. असुरक्षित माणसं कधीही प्रगती करु शकत नाहीत. ते याच्या खांद्यावर त्याच्या खांद्यावर प्रवास करत असतात. कोणी उतरवलं की त्यांना त्याची जाणीव होते,” असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना त्यांचे नाव न घेता लगावला.