शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञाताने फोन कॉलच्या माध्यमातून ही धमकी दिली आहे. “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू,” अशी धमकी देण्यात आल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे. यानंतर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
संजय राऊत फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, “गेल्या दोन दिवसांपासून मला ९९३०५४०१०८ या नंबरवरून सतत धमक्या आणि गोळ्या घालून ठार मारण्याचे फोन येत आहेत. अशाच प्रकारचे फोन बंधू आणि विधानसभा सदस्य सुनील राऊत यांना देखील येत आहेत. महाराष्ट्र सरकारविरोधात बोलणं बंद करा, नाहीतर गोळ्या घालून ठार मारू, असा धमकी देणाऱ्यांचा सुर दिसतो.”
हेही वाचा : “…हा पूर्णत: बालीशपणा”, देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ दाव्यावर रोहित पवारांचं प्रत्युत्तर
“ज्या गुंडाने माझ्यावर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले होते…”
“मी या आधीही मला आलेल्या धमक्यांबाबत आपणास कळविले होते. मात्र, त्याबाबत कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही. ठाण्यातील ज्या गुंडाने माझ्यावर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले होते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर होर्डिंगवर झळकत आहेत ही चिंतेची बाब आहे. मला नव्याने आलेल्या धमक्यांची रेकॉर्डिंग मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवली आहे,” असं संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं.
हेही वाचा :शरद पवारांना ठार मारण्याची धमकी देणारा भाजपा कार्यकर्ता; बावनकुळे, दानवेंसोबतची छायाचित्रे समोर
सुनील राऊत काय म्हणाले?
“गुरूवारी ( ८ जून ) ४ ते ४.१५ च्या दरम्यान तीन ते चार फोन आले. त्याने मला आणि संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू. सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा दोघांना जीवे मारू,” असं सुनील राऊत यांनी सांगितलं.
“संजय राऊतांना नष्ट करण्याची सुपारी…”
“गेले अनेक दिवस झाले, अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. सरकारला त्याची जाणीव करून दिली आहे. पण, सरकार याबाबत कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते संजय राऊतांना नष्ट करण्याची सुपारी सरकारने घेतल्याचं वाटतं,” असा गंभीर आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.