पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना आज सन्मानित करण्यात येणार आहे. हा अराजकीय कार्यक्रम असला तरीही अनेक राजकीय नेते या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हजर असणार आहेत. त्यामुळे आता कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होऊ लागली आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही मोदींना राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांबाबत थेट आव्हान केले आहे.

हेही वाचा >> “शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची कानउघडणी करावी”, पुण्यातील ‘त्या’ कार्यक्रमावरून काँग्रेसची मागणी

“लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद आम्ही निर्माण केला नाही. हा वाद मोदींनीच निर्माण केला आहे, हा वाद भाजपाने निर्माण केला आहे. कारण, व्यासपीठावर शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत. कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवारही असतील किंवा ते समोर बसतील. आता भाजपाची किंवा मोदीजींची भूमिका काय हा प्रश्न आहे. एकतर तुम्ही केलेले आरोप खोटे आहेत. भय निर्माण करून तुम्ही लोकांना पक्षात घेत आहात आणि आपला पक्ष वाढवत आहात. शिवसेनेवर किंवा राष्ट्रवादीवर तपास यंत्रणांच्या माध्यमातून केलेले आरोप हे सगळं खोटं आणि निष्कलंक आहे हे जाहीर करा, मग त्या व्यासपीठावर चढा. भ्रष्टाचारांसोबत तुम्ही बसणार नाही मग आता का बसताय? तुम्ही जाहीर करा की हे भ्रष्टाचारी लोक नाहीत”, असं संजय राऊत म्हणाले.

“आता या व्यासपीठावर जायचं की नाही हा शरद पवारांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शरद पवारांनी तीन महिन्यांपूर्वी आमंत्रण दिलं होतं. प्रोटोकॉलनुसार निमंत्रक कार्यक्रमाला हजर राहायला हवेत. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. तुमच्यावर आरोप केले, तुमचा पक्ष फोडला, या देशात हुकूमशाहीआणण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळकांनी हुकूमशाहीविरुद्ध गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी स्वातंत्र्यसंग्रमासाठी स्वतःला झोकून दिलं. त्या टिळकांच्या नावाने मोदींना पुरस्कार दिला जातोय. त्यामुळे ही मोदींची जबाबदारी आहे आणि तितकीच शरद पवारांसारख्या इंडियाच्या मोठ्या नेत्यांची जबाबदारी आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

Story img Loader