Shivsena Sanjay Raut Convicts Defamation Case : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणात माझगाव कोर्टाने त्यांना दोषी ठरवले असून त्यांना १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. तर, त्यांना न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याप्रकरणी संजय राऊत यांनी भाजपा आणि न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला सरन्यायाधीशांकडे जातात. मग भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्या सारख्या लोकांना न्याय कसा मिळेल? हे अपेक्षितच होतं. मीरा भाईंदर येथील शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मी केला नव्हता. मीरा भाईंदर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी हा दावा केला होता. तसंच, मीरा भाईंदरचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या भ्रष्टाचारविरोधात चौकशी करण्याकरता मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं. याविरोधात विधानसभेतही चर्चा झाली होती. विधानसभेतील चर्चेनंतर एक आदेशही पारीत करण्यात आला होता. मी फक्त यावर प्रश्न विचारले होते”, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं.
मग आम्हाला न्याय कसा मिळणार?
“या प्रकरणी मी पुरावेही दिले होते. पण न्याय व्यवस्थेचं संगीकरण झालं आहे. तरीही आम्ही न्यायालयाचा आदर करतो. आम्ही सेशन कोर्टात जाणार, आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही जनतेकडे जाणार. हे चालत राहतं. हेच आम्ही अपेक्षित होतो”, असंही ते म्हणाले. “मला १५ वर्षे शिक्षा ठोठावली तरीही मी सत्य बोलायचं थांबणार नाही. मी आता याप्रकरणी वरच्या कोर्टात जाणार आहे. आणि हा जो पुरावा खालच्या कोर्टाने मान्य केला नाही सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचार होतो, जनतेच्या पैशांचा अपहार होतो, त्यासंदर्भात आम्ही काही बोलायचं नाही. कारण न्यायव्यवस्थेचं संगीकरण झालं आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश गणपतीचे लाडोबाचे मोदक खायला पंतप्रधानांना बोावतात, त्या देशात आम्हाला काय न्याय मिळणार?” असा सवालही त्यांनी विचारला.
“एक वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींना फासावर लटकवलं होतं, आता संजय राऊतांना फासावर लटकवलं जात आहे. जसं अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं की न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झाली आहे हे स्पष्ट दिसतंय. आम्ही त्या कोर्टाचा आदर करतो, आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ”, असंही ते म्हणाले.